Saturday, December 3, 2016

दिव्यांगांना आर्थिक मदतीसाठी विविध योजनांद्वारे प्रयत्न - पालकमंत्री विजय देशमुख यांचे प्रतिपादन


सोलापूर दि.03 : - दिव्यांग व्यक्तीच्या विकासासाठी राज्य शासन अनेक स्तरावरुन प्रयत्न करीत आहे. जिल्हयातील दिव्यांगांना विविध आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिक लाभ देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. पण लाभार्थ्यांनी कर्जाची परतफेडही करावी, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज येथे केले.
                        जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने दिव्यांग लाभार्थ्यांना कर्ज वाटप आणि नियमित कर्ज परतफेड करणा-या लाभार्थींचा सत्कार पालकमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सात रस्ता येथील सामाजिक न्याय भवनच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त् नागनाथ चौगुले, अपंग वित्त विकास महामंडळाचे कमलेश माने उपस्थित होते.
                       पालकमंत्री विजय देशमुख म्हणाले दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. त्यासाठी आवश्यक असणारा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करुन घेतला जाईल. 
                      सामाजिक न्याय विभागाच्या अख्यत्यारितील सर्वच आर्थिक महामंडळानी आपल्या योजनांची प्रभावी प्रसिध्दी करावी आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांना काम मिळेल, यासाठी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचनाही पालकमंत्री विजय देशमुख यांनी केल्या.
                     यावेळी पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते श्रीमती लक्ष्मीबाई बंगनोळे,भाऊसाहेब आरणे, नागनाथ आदलिगे,धनाजी चोपडे, नितीन माने, खाजा जमादार, विनोद देशमुख यांना कर्जाचे धनादेश वितरण करण्यातआले.त्याचबरोबर कर्जाची वेळेत परतफेड करणा-या लाभार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
                      यावेळी महात्मा फुले विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक उत्तम मोहिते, संत रोहिदास वित्त्‍ विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक दयानंद खोत, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मण क्षिरसागर, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पोपट झोंबाडे उपस्थित होते.

                                                                0 0 0 0

No comments:

Post a Comment