Saturday, December 31, 2016

पालखी मार्गावर वारक-यांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा देणार - विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम


 पंढरपूर दि. 31 :- तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांना गती देऊन पालखी तळ व पालखी मार्गावरील कामे आषाढीपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत. देहु- आळंदी पासून पंढरपूरात येणा-या सर्व पालखी मार्गांचा विकास करुन याठिकाणी वारक-यांसाठी आवश्यक असणा-या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दिली.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांचा आढावा घेण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे, तहसीलदार नागेश पाटील, जिल्हा नियेाजन अधिकारी सर्जेराव दराडे, कार्यकारी अभियंता एस.टी. राऊत, मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपअभियंता श्री. गावडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सतीश सूर्यवंशी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त यांनी बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला आणि सर्व संबंधित अधिका-यांना योग्य त्या सूचना केल्या यावेळी ते म्हणाले तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे दर्जेदार गुणवत्ता पूर्ण व मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे.
पंढरपूर शहरात सुरु असलेली 3 रस्त्यांची कामे, 65 एकर येथील उर्वरित कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. वारक-यांना सुविधा देण्यासाठी 65 एकर जागा विकसित करण्यात आली आहे. याठिकाणी आणखी रेल्वेची 15 एकर जागा उपलब्ध होणार आहे. या 15 एकर जागेच्या मोबदल्यात रेल्वे प्रशासनाला राज्य शासनाने रायगड येथे जमीन हस्तांतरित केली आहे. रेल्वे प्रशासनाकडून पंढरपूर येथील 15 एकर जागेचे हस्तांतरणाचे आदेश लवकरच प्राप्त होतील. ही जागा प्रशासनाकडे हस्तांतरीत झाल्यांनतर या जागेचाही विकास करुन वारक-यांना पायाभूत सुविधा देण्यात येणार आहेत.
विभागीय आयुक्त म्हणाले, वाखरी येथील पालखी तळाची जागा अपुरी पडत असून याठिकाणी आणखी जागा उपलब्ध करुन घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर त्या जागेवरही              वारक-यांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. पालखी तळ आणि पालखी मार्गावर वारक-यांसाठी वीज- पाणी, स्नानाची व्यवस्था, शौचालय व्यवस्था देण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.
त्यानंतर विभागीय आयुक्त यांनी वाखरी पालखी तळ, गजानन महाराज मठ येथे सुरु असलेल्या रस्त्याचे काम आणि 65 एकर येथील कामाची पहाणी करुन संबंधित अधिका-यांना योग्य त्या सूचना दिल्या.





No comments:

Post a Comment