Monday, December 26, 2016

आदिवासी आदान- प्रदान महोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहकार्य -- जिल्हाधिकारी सौरभ राव


जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक संपन्न
                                  
         पुणेदि.26 : आदिवासी आदान-प्रदान महोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. हा महोत्सव केवळ सांस्कृतिक आदान प्रदानापुरता मर्यादित न राहता  आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील युवकांना रोजगार निर्मितीबाबत माहिती पोहोचविण्याबरोबरच त्यांचा व्यक्तिमत्व विकास घडवण्यात उपयुक्त ठरेल,असा विश्वास जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी व्यक्त केला.
नेहरू युवा केंद्रातर्फे जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात श्री.सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला नेहरू युवा केंद्राचे समन्वयक यशवंत मानखेडकर, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते तथा समिती सदस्य सर्वश्री डॉ.मिलिंद भोई, हितेंद्र सोमाणी डॉ. शंतनू जगदाळे, प्रवीण निकम,डॉ.अन्वर शेख, रामदास मारणे, सदस्य दिगंबर माने, रसिका कुलकर्णी व अन्य सदस्य उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. राव यांनी नेहरु युवा केंद्रातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा तसेच पुण्यात या महोत्सवांतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. या महोत्सवादरम्यान आदिवासी युवकांसाठी विविध क्षेत्रातील तज्ञाशी सुसंवाद कार्यक्रम, विविध माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना भेटी, आयुका तसेच नामवंत शिक्षण संस्थांना भेटी आदी बाबींचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती श्री. मानखेडकर यांनी दिली. या महोत्सवाची माहिती अधिकाधिक युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी सूचना डॉ. भोई यांनी यावेळी  केली.
                                        
                                      00000

No comments:

Post a Comment