Saturday, December 3, 2016

अल्पसंख्यांक विकास कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर


सोलापूर दि.03 : - अल्पसंख्यांकाच्या कल्याणाकरिता पंतप्रधानांनी नवीन 15 कलमी कार्यक्रम आखला आहे. त्या अनुषंगाने संबंधित विभागांनी त्यांना देण्यात आलेली जबाबदारी गांभीर्यपुर्वक पार पाडावी असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी दिले.
                        सेतू सभागृहात जिल्हा अल्पसंख्यांक विकास संनियंत्रक समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. 
                      अल्पसंख्यांक समुदायासाठी शासन अनेक कल्याणकारी योजना राबविते परंतु त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी  न झाल्याने त्या योजना संबंधित लोकांपर्यंत पोहचत नसल्याचे सांगून श्री. रेळेकर म्हणाले, संबंधित विभागांनी याबाबात सूक्ष्म नियोजन करावे तसेच त्यांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी कटीबध्द रहावे. श्री . रेळेकर यांनी अल्पसंख्यांक समुदायासाठी असलेल्या योजना , फंड शालेय उपस्थिती , स्वयंरोजगार बँकेतर्फे देण्यात येणा-या लाभाचा तसेच पोलीस विभागातर्फे  अल्पसंख्यांक समुदायासाठी करण्यात येणा-या प्रयत्नांचा आढावा यावेळी घेतला.
                        या बैठकीसाठी अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले, शिक्षणाधिकारी तानाजी घाटगे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीनिवास पत्की , जिल्हा महिला बाल कल्याण विकास अधिकारी धर्मपाल साहू, नगर अभियंता (म.न.पा.) लक्ष्मण चलवादी, मनपा  शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी श्रीमती सुधा साळुंखे , यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित हाते .
000000

No comments:

Post a Comment