Thursday, December 1, 2016

शहिद मेजर कुणाल गोसावी यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार




        पंढरपूर, दि. 1  : अमर रहे... अमर रहे, शहिद कुणाल गोसावी अमर रहे.. भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम  अशा घोषणा  आणि  आश्रुनी भारलेल्या नयनांनी हजारोंच्या उपस्थितीत शहिद मेजर कुणाल गोसावी  यांच्यावर वाखरी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
            यावेळी मेजर शहिद कुणाल गोसावी यांच्या पार्थिवास राज्य शासनाच्या वतीने  सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिलीयावेळी  जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, आमदार भारत भालके, बबनदादा शिंदे, प्रशांत परिचारक, दत्तात्रय सावंत, पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले, वाखरी गावच्या सरपंच मथुराबाई मदने, पोलीस अधीक्षक एस. विरेश प्रभू, प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी पार्थिवावर पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली.
            दुपारी साडेतीनच्या सुमारास अंत्ययात्रा वाखरी येथे आली. त्यानंतर पोलीस व लष्करी जवानांनी शहिद मेजर कुणाल गोसावी यांना अखेरची मानवंदना दिली. त्यावेळी उपस्थित जवान, तसेच जनसमुदायाच्या शोकभावना अनावर झाल्या. त्यानंतर राष्ट्रीय ध्वज शहिद जवान कुणाल गोसावी यांच्या आई वृंदा गोसावी यांच्याकडे लष्कराच्या वतीने सुपूर्द करण्यात आला.
            लष्कराच्यावतीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून शहिद कुणाल गोसावी यांना अखेरची मानवंदना दिली. पोलीसांच्यावतीनेही  शहिद कुणाल गोसावी यांना अखेरची मानवंदना देण्यात आली.  वडील मुन्नागीर आणि मेजर कुणाल यांची कन्या उमंग यांनी अग्नी दिला. यावेळी अवघा परिसर शोकाकुल झाला होता.  अमर रहे... अमर रहे शहिद कुणाल गोसावी अमर रहे.. भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम  अशा  घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी  लष्कराचे  ब्रिगेडिअर बोधे, कर्नल टिंग्रे, कर्नल अमित त्रिपाठी, कर्नल यादव, मेजर नंदी, मेजर अंकुर अगरवाल, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुनिल गोडबोले उपस्थित होते.
            तत्पूर्वी, सकाळी 10च्या सुमारास शहिद कुणाल गोसावी यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव पुणे  येथून पंढरपूर  येथे  खास हेलीकॉप्टरमधून आणण्यात आले.  त्यानंतर त्यांचे पार्थिव प्रथम त्यांच्या घरी नेण्यात आले.  तेथे त्यांच्या  सर्व कुटुंबियांनी साश्रुनयनांनी अंत्यदर्शन घेतले. आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी रणजीत कुमार, पोलीस अधीक्षक एस. विरेश प्रभू, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, सहायक पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख, तहसिलदार नागेश पाटील  यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी यांनी पार्थिवावर पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.
            त्यानंतर शहिद मेजर कुणाल गोसावी यांची अंत्ययात्रा पंढरपूर शहरातून काढण्यात आली. ही अंत्ययात्रा नाथ चौक, प्रदक्षिणा मार्ग, चौफाळा, शिवाजी चौक, सावरकर चौक, एस. टी. स्टॅण्ड येथून वाखरी पर्यंत नेण्यात आली.  यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने जमलेल्या लोकांनी साश्रुनयनांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी केली.
            शहिद कुणाल गोसावी यांचे पार्थिव येण्याची वाट आज सकाळपासूनच अवघे पंढरीवासीय पाहत होते. पंढरपुरातील सर्व व्यवहार आज बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. शहराच्या प्रत्येक चौकात शहिद मेजर कुणाल गोसावी यांना आदरांजली वाहणारे फलक लावण्यात आले होते. दाळे गल्लीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी अवघे पंढरपूर व परिसरातील नागरिक लोटले होते. यामध्ये महिला, तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी यांची लक्षणीय उपस्थिती होती.

000000

No comments:

Post a Comment