Thursday, November 17, 2016

विधान परिषद निवडणुक मतदान केंद्र व मतमोजणी परिक्षेत्रात कलम 144 लागू



पुणे. दि.17:- पुणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघातून महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणुक दि. 19 तर मतमोजणी दि. 22 नोव्हेंबर 2016 रोजी होत आहे, या निवडणुकी दरम्यान शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित रहावी यासाठी पुणे आयुक्तालयाच्या परिक्षेत्रातील मतदान केंद्र व मतमोजणी परिसरात फौजदारी दंड प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 आदेश लागू करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सह आयुक्त सुनिल रामानंद यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
            पत्रकात म्हटले आहे, पुणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघातून महाराष्ट्र विधान परिषदेची  निवडणुक दि. 19 नोव्हेंबर 2016 रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील कै. मधुकर पवळे सभागृह, पिंपरी चिंचवड, मनपा बिल्डींग पिंपरी पुणे, महात्मा गांधी सभागृह 6वा मजला जिल्हा परिषद पुणे, कॅप्टन वडके सभागृह पुणे मनपा बिल्डींग पुणे या तीन मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या तीन मतदान केंद्रावर विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान केंद्राच्या परिघापासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात दि. 19 नोव्हेंबर 2016 रोजी 00.01 वाजल्यापासून ते मतदान प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत तिन्ही मतदान केंद्राच्या परिघापासून 100मीटर सभावतालच्या परिसराच्या आतील सर्व व्यवसायिक दुकाने, रेस्टॉरंट, टपऱ्या वाणिज्यिक अस्थापना (अत्यावश्यक सेवा वगळून) आदी सर्व अस्थापना व तत्सम बाबी बंद ठेवाव्यात.
तसेच या तीनही मतदान केंद्राच्या आवारात दि. 17 नोव्हेंबर 2016 रोजी 18.00 वाजल्यापासून ते मतदान प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत कलम 144 नूसार सर्व राजकीय व्यक्ती किंवा राजकीय पक्षाशी संबधित कोणतीही व्यक्ती ते ज्या केंद्राचे मतदार नाहीत त्या मतदान केंद्रात थांबण्यास, वास्तव्य करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
तसेच या निवडणुकीची मतमोजणी दि. 22 नोव्हेंबर 2016 रोजी शासकीय अन्नधान्य गोदाम सी-5, सी-6 शिवाजीनगर पुणे-5 येथे होत आहे. या मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात दि. 21 नोव्हेंबर 2016 रोजीच्या 00.01 वाजल्यापासून ते मतमोजणी प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत कलम 144 लागू करण्यात येत आहे. या नुसार या परिसरात कोणत्याही प्रकारची हत्यारे घेवून फिरण्यास मनाई आहे, मतमोजणी परिसरात मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर वापरण्यास अथवा घेवून येण्यास मनाई आहे, मतमोजणी परिसरात खासगी इसमांना ध्वनीक्षेपक वापरण्यास मनाई करण्यात येत आहे, मतमोजणी परिसरात कोणताही मजकूर लिहीण्यास अथवा छापील मजकूर प्रकाशित करण्यास मनाई आहे, मतमोजणी परिसरात शासकीय वाहन सोडून कोणत्याही प्रकारची वाहने आणण्यास मनाई आहे, मतमोजणी परिसरात पासशिवाय प्रवेश करण्यास मनाई आहे, मतमोजणीचा निकाल जाहिर झाल्यानंतर दि. 22 नोव्हेंबर 2016 रोजी विजयी मिरवणुका काढण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती शिक्षेस पात्र राहील, असे पत्रकात नमुद करण्यात आले आहे.

*********



No comments:

Post a Comment