Monday, November 21, 2016

नगरपालिका निवडणूक निर्भय वातरणात पार पडल्या पाहिजेत --- जिल्हाधिकारी सौरभ राव

 
पुणे, दि. 21 : जिल्हयातील नगरपालिका निवडणूका नि :पक्षपाती,  निर्भय वातारणात पार पडल्या पाहिजेत. लोकसभा विधानसभा निवडणूकीप्रमाणेच सुक्ष्मनियोजन करावे. निवडणूकीत कोठेही गैरप्रकार होवू नये यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नगरपरिषद निवडणूकीत आचारसंहितेची अंमलबजावणीसाठी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक जय जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले की, या निवडणूकीबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून नियमितपणे आढावा घेतला जात आहे. निवडणूकीत कायदा व सुव्यवस्था राहिली पाहिजे. निवडणूकीत कोठेही गैरप्रकार होवू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करुन वेळीच करण्यात याबाबतचा अहवाल नियमितपणे पाठविण्यात यावा. गुन्हेगारावर वचक राहिला पाहिजे. मतदारावर प्रभाव टाकण्यासाठी देण्यात येणाऱ्या वस्तू, मद्य इत्यादी वाटपावर अंकुश ठेवावा. हातभट्टी विरुध्द कार्यवाही करावी. तसेच या कालावधीत नगरपालिका भागातील दुकानाची मागील वर्षाची विक्री व यावर्षीची विक्री याची पडताळणी करुन अहवाल देण्यात यावा. याद्वारे प्रभावीपणे नियोजन करुन निवडणूकीत प्रशासनाचा प्रभाव दिसून आला पाहिजे यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना संबधितअधिकाऱ्यांना दिल्या.
निवडणूक कालावधीत भरारी पथक,दक्षता पथक, ‍स्थिर पथक नगरपरिषद स्तरावर प्रभावीपणे कार्यरत असले पाहिजे. संबधित पथकांच्या प्रमुखांची स्वतंत्र बैठक घेवून काम करावे. का य करु नये याबाबत मार्गदर्शन केले जावे. अशा सूचना दिल्या. त्याचप्रमाणे राजकीय पक्ष, उमेदवार यांच्या रोख रक्कमाचा मोठा व्यवहार तसेच बँकेमार्फत होणाऱ्या मोठया संशयास्पद आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवण्याच्या सूचना संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
निवडणूकीत पेड न्यूज,सोशल मिडिया व इंटरनेट इत्यादी विशेष लक्ष द्यावे. अतिशय प्रभावी कमी खर्चाच्या या माध्यमाद्वारे चुकीचे काही होवू नये. यामधीलअद्यावत तंत्रज्ञान अवगत असलेल्या तज्ञांचा यासाठी सहभाग घ्यावा तसेच या निवडणूकीतही स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी,युवक आदिंचा सहभाग घेवून मतदारामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले.
याबैठकीत राज्य उत्पादन शुल्क,आयकर विक्रीकर तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment