Wednesday, November 30, 2016

कॅशलेस’ व्यवस्था निर्माण करण्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज ... जिल्हाधिकारी सौरभ राव

 ‘निश्चलनीकरणानंतरच्या परिस्थतीचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

          पुणे, दि. 29 : सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँक अधिकाऱ्यांनी समाजातील सर्व घटकांना बँकेच्या व्यवहारात समाविष्ट करुन घ्यावे. नागरिकांनी कॅशलेस व्यवहारावर भर द्यावा यासाठी  सर्वांनी विशेष प्रयत्न करावेत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज येथे केले.
            निश्चलनीकरणानंतर करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आणि निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजनांसाठी जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होतीबैठकीत जिल्हयातील विविध बँकांचे अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी सौरभ राव बोलत होते.
            निश्चलनीकरणानंतर कॅशलेस व्यवहार, -पेमेंट, -बीलींग, रुपे कार्डाचा मोठया प्रमाणावर वापर ही काळाची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. नवीन खाते उघडणे, कामगार संघटना व पणन महामंडळाच्या सहकार्याने शेतमजूर, कामगार यांना बँकींग व्यवहाराशी जोडणे, निश्चलनीकरणाचे फायदे यावर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना केल्या. बँक व्यवहाराबद्दल नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना करुन बँकाना यासंदर्भात काही अडचण असल्यास संबधितांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
            जन धन खात्याद्वारे कुटूंब बँकेशी जोडले गेले आहे परंतु, वैयक्तिक खातेधारकांमध्ये बँकांनी  वाढ करावी, अशी सूचना रिझर्व्ह बँकेचे सहायक सरव्यवस्थापक बी.एच.मेश्राम यांनी केली. सर्व बँक खात्याचे आधार कार्डशी संलग्निकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना त्यांनी यावेळी बँक अधिकाऱ्यांना केली.  
            या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000


No comments:

Post a Comment