Sunday, November 13, 2016

स्टार्टअप उद्योगांनी कृषी क्षेत्रातही काम करावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन: आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे उद्घाटन



स्टार्टअप उद्योगांनी कृषी क्षेत्रातही काम करावे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन: आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे उद्घाटन

पुणे, दि. १३ (विमाका): कृषी क्षेत्रात अधिक नाविन्यपूर्ण संशोधन होण्याची आवश्यकता असून स्टार्टअप उद्योगानीही कृषी क्षेत्रात काम करायला हवे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन २०२५ या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव गिरधर पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष दिलीपराव वळसे-पाटील आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘जागतिक स्तरावरील विचार केला असता कृषी क्षेत्रात संशोधन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला गेला आहे. त्या तुलनेत आपल्या देशात संशोधन आणि तंत्रज्ञानाचा तितकासा वापर होत नाही. हा वापर वाढण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सारख्या संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. स्टार्टअप उद्योगांनी कृषी क्षेत्रात संशोधन, विकास, तंत्रज्ञान विस्तार, बीज संशोधन आदी क्षेत्रात काम करण्याची आवश्यकता आहे. यामुळे देशातील अनेक तरुणांना रोजगार मिळेल आणि शेतीच्या विकासाला हातभार लागेल.’
शेतीसमोर दुष्काळ, पावसाची अनियमितता, घटत जाणारी जमीन धारणा आदी आव्हाने आहेत. या आव्हानावर मात करून आपणास उत्पादकता वाढवायची आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ‘ऊसाच्या पिकात आंतरपीक घेण्याकडे शेतकरी वळला आहे. आता ऊसाच्या पिकासाठी सूक्ष्म सिंचन करण्याची आवश्यकता आहे. यामुळे उत्पादकता वाढते आणि साखरेचे उत्पादन चांगले होत असल्याचा अनुभव आहे.’
डाळीच्या उत्पादनावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘ऊसाच्या उत्पादनाबरोबरच इथेनॉल उत्पादनावर साखर कारखान्यांनी भर द्यायला हवा. गेल्या दोन वर्षात इथेनॉलचे उत्पादन आणि विक्रीत वाढ झाली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इथेनॉलवर चालू शकते. यामुळे खनिज तेलाच्या आयातीसाठी लागणारे परकीय चलनाची बचत होऊ शकते.’
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने बांबूच्या संशोधनाकडे लक्ष द्यावे अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली. ते म्हणाले, ‘ऊस आणि बांबू यांच्यात साम्य आहे. बांबूला जागतिक स्तरावर चांगली मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो.’
केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांबाबत घेतलेल्या निर्णयाला जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘देशाची अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेतील काळा पैसा दूर करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तीस डिसेंबरपर्यंत जनतेने वेळ द्यावा. सर्व व्यवस्था सुरळीत होईल.’
साखरेबरोबरच उपउत्पादनावरही
कारखान्यांनी लक्ष द्यावे: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘जागतिकीकरणानंतर राज्यातील साखर कारखानदार उद्योगाला राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करावी लागत आहे. त्यामुळे आता या उद्योगाला केवळ साखर उत्पादन करून चालणार नाही. सहवीज निर्मिती, इथेनॉल उत्पादन यासारख्या उपउत्पादनांवर साखर कारखानदारीने लक्ष केंद्रित करायला हवे.’
ऊस पीक येत्या तीन वर्षात सूक्ष्म सिंचनावर वळवण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. त्यासाठी शासन, शेतकरी आणि उद्योग यांची मदत घेतली जाईल. ऊसाची उत्पादकता वाढवण्याबरोबरच पाण्याचा किफायतशीर वापर करण्यासाठी लक्ष केंद्रित करावे लागणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यातील बहुतांश कारखान्यांनी उसासाठीची एफआरपीची रक्कम आदा केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याला एफआरपीची रक्कम मिळावी यासाठी राज्य शासन नेहमीच आग्रही आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘साखर उद्योगासमोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांचा विचार आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी या परिषदेचे संयोजन करण्यात आले आहे. ऊसाची उत्पादकता वाढवणे, कारखानदारीत आधुनिक तंत्रज्ञान आणणे, तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करणे या बाबींचा या परिषदेत विचार होणार आहे.
यावेळी राज्यातील सहकार, साखर कारखानदारी, कृषी, उद्योग अशा विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते. सूत्रसंचालन मानसी सोनटक्के यांनी केले.
क्षणचित्रे
·        कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी स्थापन केलेल्या या संस्थेबाबतची माहिती देणारा लघुपट दाखविण्यात आला. या लघुपटात संस्थेच्या विकासाबरोबरच विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
·        पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करून त्यांचा यथोचित गौरव केला आहे. वसंतदादांनी आपले सार्वजनिक जीवन कृषी व सहकार क्षेत्रात घालवून भरीव योगदान दिले. परिणामी शेतीमध्ये परिवर्तन झाल्याचे दिसून येत आहे. ते दूरदृष्टीचे नेते होते, या शब्दात त्यांच्या कार्याचा गौरव केला.
·        वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आगमन होताच क्षेत्रीय ऊसाची पाहणी केली. नवीन वाण आणि नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली. शरद पवार यांनी सार्वजनिक जीवनात काम करण्याला आता ५० वर्षे पूर्ण होत आहे. त्यांनी राजकारणात शेती आणि शेतकरी केंद्रबिंदू मानून काम केले, असा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्याचबरोबर राज्याचे तरुण व अभ्यासू मुख्यमंत्री यांच्या राजकीय जीवनालाही  २५ वर्षे पूर्ण झाल्याचे सांगून देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.
·        सौर उर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्र शासन चांगले काम करीत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले. सहकार क्षेत्राने सौर उर्जेच्या क्षेत्रात योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
·        नरेंद्र मोदी हे उर्जावान पंतप्रधान आहेत. ते काल जपानच्या दौऱ्याहून भारतात आले. आज सकाळी गोवा, दुपारी बेळगाव आणि आता महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासारखा काम करणारा पंतप्रधान देशाला लाभला आहे, असे गौरवउद्गार शरद पवार यांनी व्यक्त केले.
·        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्रंदिवस काम करणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
·        साखर उद्योग शेतकऱ्यांसाठी वरदान असला तरी गेल्या दोन वर्षात पाउस कमी पडल्यामुळे संकटाला तोंड द्यावे लागले. अशाप्रसंगी केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव मदत केली. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
·        व्हिएसआय संस्थेने यापुढेही कृषी संशोधन क्षेत्रात काम करावे, शासन आपल्याबरोबर आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले.
·        तीन दिवस चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेसाठी महाराष्ट्राबरोबरच देशातील अन्य राज्य आणि परदेशातील कृषी शास्त्रज्ञ सहभागी झाले.

****

No comments:

Post a Comment