Monday, November 28, 2016

जिल्हा माहिती अधिकारी गोविंद अहंकारी यांना पदोन्नती निमित्त निरोप





पुणे, दि. 28 (वि.मा.का.) : माहिती व जनसंपर्क विभागातील सर्व घटकांनी आधुनिक माध्यम, तंत्रज्ञानाचा वापर करुन  तत्परतेने  काम केल्यास शासन विषयक माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यास कमी वेळ लागेल, असे मत पुणे विभागाचे माहिती उपसंचालक मोहन राठोड यांनी व्यक्त केले.
            जिल्हा माहिती अधिकारी गोविंद अहंकारी यांची उपसंचालक (माहिती) (वृत्त) पदी पदोन्नतीने मुंबई येथे बदली झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आणि निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी श्री. राठोड बोलत होते. यावेळी सहायक संचालक वृषाली पाटील, माहिती सहायक सर्वश्री सचिन गाढवे, जयंत कर्पे, संग्राम इंगळे यांच्यासह विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
            स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आपल्या विभागाशी संबंधित चौफेर ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे, असे सांगून श्री. राठोड म्हणाले, शासनाची माहिती जनतेपर्यंत तात्काळ पोहोचविण्यासाठी आधुनिक माध्यम तंत्रे, सोशल मिडीया यांचा उपयोग करणे गरजेचे आहे. व्हॉटस्अॅपच्या युगात आपण आपल्या माहिती व जनसंपर्क विभागाची विश्वासार्हता राखून असल्यामुळे आपला विभाग वरिष्ठ पातळीवर महत्त्वपूर्ण ठरला आहे. पुणे विभागाला नाव लौकिक मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असेही श्री. राठोड म्हणाले.
            सत्काराला उत्तर देताना श्री. अहंकारी म्हणाले की, पुणे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पाच महिने काम करण्याची संधी मिळाली. सर्वांनी आपापली भूमिका उत्कृष्ट बजावल्यास काम सुरळीत पार पडण्यास मदत होते. सर्वांना बरोबर घेवून काम करण्यास नेहमीच प्राधान्य दिले आहे. मुख्यालयातील वृत्त शाखेची जबाबदारी मिळाल्याने यापुढेही जिल्हा स्तरावर सर्वांशी संपर्क होत राहील, असेही ते म्हणाले.
            यावेळी सहायक संचालक वृषाली पाटील, माहिती सहायक सचिन गाढवे, जयंत कर्पे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत आणि आभार संग्राम इंगळे यांनी मानले.

00000000

No comments:

Post a Comment