Thursday, November 24, 2016

एटीएममध्ये तत्काळ सुधारणा करा केंद्रीय निरीक्षक विजयालक्ष्मी बिदरी यांच्या सूचना



                                                                                                
सोलापूर दि.24:- नव्या नोटांचे वितरण करता यावे यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांनी आपल्या एटीएम सेंटर मध्ये आवश्यक त्या सुधारणा (कॅलिब्रेशन) करुन घ्याव्यात, अशा सूचना केंद्र सरकारच्या निरीक्षक विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज येथे दिल्या. 
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयामुळे उद्भवलेली परिस्थिती आणि त्यावर उपाययोजना यांचा आढावा घेण्यासाठी श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी श्रीमती बिदरी यांनी या सूचना दिल्या. 
या बैठकीस जिल्हाधिकारी रणजीतकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा पोलीस अधिक्षक वीरेश प्रभू, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, मुद्रांक जिल्हाधिकारी एस.एन.दुतोंडे, उपजिल्हाधिकारी संजीव जाधव, सोलापूर महापालिकेचे लेखाधिकारी दत्तात्रय लोंढे, पोस्टाचे वरिष्ठ अधीक्षक बी.आर. नानजगी, अग्रणी बँकेचे प्रभारी व्यवस्थापक सुरेश श्रीराम आदी उपस्थित होते.
श्रीमती बिदरी यांनी सांगितले की, नव्या नोटा मिळाल्यावर त्या लवकरात लवकर वितरीत करता येण्यासाठी एटीएम मध्ये सुधारणा करण्याची (कॅलिब्रेशन) आवश्यकता आहे. यासाठी किमान पाच ते सात दिवस लागतात. काही बँकांनी अशी प्रक्रिया केली आहे. ज्या बँकांनी अद्याप केलेली नाही त्यांनी ही प्रक्रिया गतीने करावी. जुन्या नोटा जमा करण्यास येणाऱ्या ग्राहकांच्या हातावर मार्करच्या सहाय्याने खूण करा जेणेकरुन एकच व्यक्ती वारंवार पैसे जमा करण्यास येणार नाही.
 ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग यांच्यासाठी पैसे जमा करण्याची स्वतंत्र व्यवस्था करा. त्यांना पाणी, बसण्यासाठी आसन व्यवस्था करा, अशा सूचना श्रीमती  बिदरी यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 
श्रीमती बिदरी यांनी शेतीसाठी आवश्यक बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके यांच्या खरेदीची माहिती घेतली. शेतकऱ्यांना आता औषधे आणि खते खरेदी करण्यासाठी पैसे लागतील. त्यामुळे जुन्या नोटांच्या आधारे खते, कीटकनाशके खरेदी करण्यास परवानगी मिळाल्यास शेतकऱ्यांना आधार मिळेल, असे श्रीमती बिदरी यांना सांगण्यात आले. यावर ही बाब केंद्र सरकारकडे सुचविण्यात येईल, असे बिदरी यांनी सांगितले. नोटांच्या बंदीनंतर शेतमालाचे भाव घसरले आहेत, अशी माहिती श्री. बिराजदार यांनी दिली. जिल्ह्यातून डाळींब, कांदा, द्राक्षे यांची उलाढाल मोठ्या प्रमाणावर चालते. या शेतकऱ्यांच्या निर्यातीला सवलत किंवा अनुदान मिळण्याची  विनंती उपजिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी केली. 
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 4739 दस्तांची नोंद झाली होती. त्यामुळे शासनाला 11 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. पण नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत 1435 दस्तांची नोंद झाली असून तीन कोटी सदतीस लाख रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती श्री. दुतोंडे यांनी दिली. 
महापालिकेला कर वसुलीत 32 टक्के वाढ झाली असून 22 कोटी रुपये जमा झाले आहेत. महापालिकेला जुन्या नोटांव्दारे  कर स्वीकारण्यास मुदतवाढ मिळावी, असे श्री. लोंढे यांनी सांगितले. 
पतसंस्था, नागरी सहकारी बँक आणि जिल्हा सहकारी बँकांच्या विविध शाखांत जमा झालेल्या रकमेची सविस्तर माहिती जिल्हा प्रशासनाकडे द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी रणजीकुमार यांनी केली. यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक किसन मोटे यांनी बॅकेकडे 200 कोटीहून जास्त रुपयांच्या आसपास रक्कम जमा झाली आहे. ही रक्कम कोषागार शाखा स्वीकारत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यासाठी पुरेशी रक्कम उपलब्ध झालेली नाही. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला भरघोस रक्कम मिळावी, अशी विनंती  त्यांनी केली.
राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचे वेतनातील 50 टक्के रक्कम दहा हजार रुपयांच्या मर्यादेत रोखीने द्यावे अशी मागणी केली आहे. या मागणीबाबत राज्य (कर्मचारी संघटनेचे) शासनाला पत्र पाठवले जाणार आहे, असे जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 8 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील 536 शाखांमधून सुमारे 3175 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक भारतीय स्टेट बँकेकडे जमा झाली आहे. प्रमुख बॅकाकडे जमा झालेली रक्कम पुढीलप्रमाणे भारतीय स्टेट बँक – 576.10 कोटी, बँक ऑफ इंडिया 507.64 कोटी, बँक ऑफ बडोदा – 478.24 कोटी, आयसीआयसीआय 328.64 कोटी, जिल्हा मध्यवर्ती बँक – 240 कोटी,  आतापर्यंत 91.66 कोटी रुपयांचे नवीन चलन देण्यात आले आहे. बँक ऑफ इंडियाने 12.29 कोटी, भारतीय स्टेट बँकेने 28.93 केाटी रुपयांच्या नव्या नोटा वितरीत केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.
00000 

No comments:

Post a Comment