Friday, November 18, 2016

साहित्य संमेलनामुळे दोन संस्कृतीचा मिलाप पंजाबी साहित्याची देशात अमिट छाप - मुख्यमंत्री







पुणे, दि. 18   (वि.मा.का.)  : पंजाबी साहित्याने आपल्या देशात अमिट छाप सोडली असून हे साहित्य देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वात जावे. महाराष्ट्र आणि पंजाब यांचे वेगळे नाते आहे. महाराष्ट्रातून संत नामदेव हे पंजाबात गेले तर गुरु गोविंद सिंग हे महाराष्ट्रात आले. घुमाण येथे मराठी साहित्य संमेलन झाले तर आता विश्व पंजाबी साहित्य संमेलन महाराष्ट्रात होत आहे. पंजाब आणि महाराष्ट्राचे नाते यापुढेही अधिक दृढ व्हावे, असे विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
सरहद संस्थेच्या पुढाकाराने पुणे येथे भरविण्यात आलेल्या पहिल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलन उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
 विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुरजीतसिंग पातार तर उद्घाटक म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार, संजय नहार, चित्रपट अभिनेते धमेंद्र, महापौर प्रशांत जगताप, पी. एस पसरीचा, संतसिंह मोखाजी, गिरीश गांधी, उज्वल दोसजह, डॉ. एस.पी. ओबेरॉय, एस. तारलोचन सिंग, रज्वी शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पंजाबी भाषेत गुरु ग्रंथसाहिब, गुरुनानक व गुरु गोविंद सिंग यांचे विचार आणि पंजाबी साहित्याचे महत्व सांगून उपस्थितांची वाहवा मिळविली. आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुरु गोविंद सिंग यांची 350 वी जयंती सुरु आहे. या निमित्त महाराष्ट्रात आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात हे संमेलन होत आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. संपूर्ण देशातून व परदेशातून आलेल्या साहित्यिकांचे अभिनंदन करुन ते म्हणाले, गुरु गोविंद सिंग यांनी आपल्या विचाराने संपूर्ण विश्वाला समतेची शिकवण दिली. त्यांचे शौर्य आणि विवेक सर्वांसाठी आदर्श आहे. लढवय्या म्हणून त्यांची देशात ओळख होती. त्यांनी ग्रंथ साहिबलाच गुरु मानले. महाराष्ट्र आणि पंजाब यांचे अतूट नाते आहे. लहानपणी माझ्यावर गुरु गोंविंद सिंग यांच्या विचारांचे संस्कार झाले, असे स्पष्ट करुन ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व गुरु गोंविंद सिंग यांनी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून कार्य केले.        
            पंजाबी हे लढवय्ये आहेत. देशाच्या रक्षणासाठी ते नेहमीच पुढे असतात. त्यांचे साहित्य व त्यांनी रचलेली गाणी अजूनही रुंजी घालतात. अमृता प्रितम यांच्यासारख्या साहित्यिकांचे साहित्य अजूनही विविध भाषेमध्ये लोकप्रिय आहे. संजय नहार यांनी महाराष्ट्र आणि पंजाबी संस्कृतीचा मिलाप साहित्य संमेलनाच्या नि‍मित्ताने घडवून आणल्या बद्दल त्यांना धन्यवाद दिले.
            केंन्द्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले, पंजाबमधील घुमान येथे मराठी साहित्य संमेलन झाले होते, त्यावेळी पुण्यात पंजाबी साहित्य संमेलन व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. पंजाब ही वीरांची भूमी आहे. गुरुनानक यांनी संपूर्ण जगाला विचार दिला. गुरु गोविंद सिंग यांचे शौर्य व बलिदान सर्वांना माहित आहे. साहित्य हा प्रकार असा आहे, पुढे भविष्यात दिशा देण्याचे काम करीत असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, विज्ञानात कितीही प्रगती झाली तरी सुसंस्कृतपणा व समृध्द जीवन साहित्यच संपन्न करीत असते. साहित्यामुळे प्रबोधन करता येते. नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम साहित्य करीत असते.   साहित्य संमेलनाचे संयोजक संजय नहार यांचे सर्वांना एकत्र आणण्याचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत नामदेवांनी महाराष्ट्रातच नव्हे तर राज्याबाहेरही प्रबोधनाचे कार्य केले आहे. साहित्य हे समाजाचे डोळे आहेत, या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
            माजी केन्द्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी आपल्या भाषणात गुरु ग्रंथ साहिब, गुरुनानक व गुरुगोविंदसिंग यांचे विचार आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
             यावेळी संजय नहार, चित्रपट अभिनेते धर्मेंद्र  यांनीही आपले विचार व्यक्त केले.


0000000000

No comments:

Post a Comment