Sunday, November 13, 2016

शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन परिषदे निमित्त प्रदर्शनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन



पुणे, दि. १३ (विमाका): वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आंतरराष्ट्रीय ‘शुगर व्हॅल्यू चेन-व्हिजन २०२५’ शुगर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या निमित्ताने आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनास उत्पादन वाढीसाठी विविध विषयांशी संबंधित प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली. त्याची पाहणी करून संबंधितांशी चर्चा करून माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणून घेतली.
याप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदराव पवार, केंद्रीय मानव संशोधन व विकासमंत्री प्रकाश जावडेकर, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रदर्शनामध्ये साखर उद्योगाशी निगडीत १८२ स्टॉल्स  लावण्यात आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया, चीन, कॅनडा, बेल्जियम या चार देशासह देशातील उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, तामिळनाडू, दिल्ली आदी राज्यातील साखर उद्योगांशी निगडीत संस्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. तसेच राज्यातील महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, राज्यातील चार कृषी विद्यापीठे तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व अन्य संबंधित संस्थांचे ऊस उत्पादन व वाढीशी निगडीत स्टॉल्स या प्रदर्शनात लावण्यात आले आहेत.
****


No comments:

Post a Comment