Friday, November 18, 2016

जिल्हयात येत्या तीन वर्षात 50 लाख वृक्षलागवड करणार - उपवन संरक्षक एस.एन.माळी यांची माहिती



सोलापूर दि.18 : - सोलापूर जिल्हयात आगामी तीन वर्षात सुमारे 50 लाख वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट असल्याची माहिती उपवन संरक्षक एस.एन.माळी यांनी आज दिली.
            राज्यात सन 2017 ते 2019 या कालावधीत 50 कोटी वृक्षलागवड करण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. त्यापैकी सन 2017 या वर्षात तीन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट आहे. या लागवडीच्या नियोजनासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्या बैठकीत श्री.माळी यांनी ही माहिती दिली. श्री.माळी यांनी सांगितले की, सन 2017 या वर्षी चार कोटी, 2018 मध्ये तेरा कोटी आणि सन 2019 मध्ये 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दीष्ट आहे.यासाठी सर्वप्रथम प्रत्येक जिल्हयातील वनेतर क्षेत्र किती आहे याचा आढावा घेतला जात आहे. ही माहिती 31 डिसेंबर 2016 पुर्वी होण्याची अपेक्षा आहे. जेणेकरुन प्रत्येक जिल्हयात वृक्ष लागवडी योग्य उपलब्ध असणारी जमीन आणि त्यावर अंदाज बांधता येणे शक्य होणार आहे. यामध्ये रस्ता दुतर्फा क्षेत्र कालवा दुतर्फा  क्षेत्र, लोहमार्ग दुतर्फा, खाजगी, पडीक जमीनी, संरक्षण विभागाकडील जमिन, औद्योगिक वसाहत, शैक्षणिक संकुल यांचा समावेश होतो. जिल्हयातील ही माहिती संकलित करुन वन विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. यासाठी वन विभागाकडून जिल्हयात नऊ ठिकाणी रोपवाटीका घेण्यात येणार आहे. वन विभागाकडून 2017- 18 मध्ये 12.87 लाख रोपे तयार करण्यात येणार आहेत.त्याचबरोबर ग्रामपंचायत आणि इतर यंत्रणांकडून  दहा लाख रोपे तयार केली जाणार आहेत. असे श्री.माळी यांनी बैठकीत सांगितले.
             यानुसार सार्वजनिक बांधकाम, सोलापूर महानगरपालिका,सोलापूर विद्यापीठ, टपाल विभाग, पोलीस विभाग यांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जागांची माहिती द्यावी असे आवाहन श्री.माळी यांनी केले. यावर वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदणे आणि रोपे खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करुन मिळावा, अशी मागणी अनेक विभागप्रमुखांनी केली. यावर ही मागणी शासनाकडे कळविली जाईल, असे श्री.माळी यांनी सांगितले. वृक्ष लागवड अभियानात देशी झाडे लावावीत. असा मुद्दाही काही विभागप्रमुखांनी मांडला.
             बैठकीस सोलापूर महापालिका,सोलापूर विद्यापीठ,जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, उद्योग आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
                                                             0 0 0 0 

No comments:

Post a Comment