Monday, November 28, 2016

जिल्हा सोलापूर डाळींब निर्यातीचे केंद्र बनायला हवा पणनमंत्री सुभाष देशमुयांख चे प्रतिपादन : डाळींब उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा

    
महाराष्ट्र राज्य सोलापूर दि.28 :- सोलापूर जिल्हा डाळींब निर्यातीचे केंद्र बनायला हवा. त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही सहकार, पणनमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे अध्यक्ष सुभाष देशमुख यांनी आज येथे दिली.
कृषि पणन मंडळ, कृषि विभाग, अपेडा, नवी दिल्ली आणि राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने डाळींब उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सहकार महर्षि शिवदारे सभागृहात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर.के. पाल, अपेडाचे सहाय्यक सरव्यवस्थापक डॉ. सी.पी.सिंग, डाळींब उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीकांत जाचक, महाअनारचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, गोविंद हांडे, अंकुश पडवळे आदी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, राज्यात सोलापूर जिल्ह्यात डाळींबाची लागवड सर्वाधिक होते. पण गुणवत्ता, निर्यात, मूल्यवर्धन आणि ब्रँडिंग करण्याची आवश्यकता आहे. निर्यातीसाठी उत्पादन पश्चात असणारी साखळी बळकट करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने नजिकच्या काळात प्रभावी भूमिका बजावली जाईल.
शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भावमिळावा यासाठी राज्य शासनाने माल तारण योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीत ठेवून कर्ज घेऊ शकतो. योग्य भाव आल्यास विक्रीसाठी बाजारात आणू शकतो. यासाठी केवळ सहा टक्के व्याज आकारणी केली जाणार आहे, असे श्री. देशमुख यांनी सांगितले. डाळींबावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरु करण्यात अद्याप  म्हणावे तितके यश आलेले नाही. पण राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्राने  याबाबत पुढाकार घ्यावा, असे आवाहनही श्री. देशमुख यांनी केले.
प्रास्ताविक विभागीय उपनिबंधक संतोष पाटील यांनी केले आहे. यावेळी श्री. चांदणे, श्री. जाचक यांचीही भाषणे झाली. पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर एन. पाटील यांनी कार्यशाळेचे संयोजन केले.
*****



No comments:

Post a Comment