Friday, July 1, 2016

स्वच्छता अभियानात महाराष्ट्र अव्वल

स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीचे ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
स्वच्छता अभियानात महाराष्ट्र अव्वल
-    ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे



पुणे दि. 1: स्वच्छ भारत अभियान हे केंद्रशासनाचे अत्यंत महत्वकांक्षी अभियान आहे. या अभियानात महाराष्ट्र अव्वल असून लोकसहभागामुळेच हे शक्य झाले असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज केले.
   येथील विधान भवन परिसरात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीचा शुभारंभ श्रीमती मुंडे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, आमदार माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त एस चोक्क्‍लिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई उपस्थित होते.
   मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, वनमहोत्सवाच्या निमित्ताने राज्यभरात वृक्षलागवडीचे मोठे काम हाती घेण्यात आले आहे. वन विभाग व ग्राम विकास विभाग मिळून हे काम करत आहेत. वृक्षलागवडीचे हे अभियान यापुढेही असेच सुरु ठेवण्यात येणार आहे. स्वच्छ मनातूनच स्वच्छ कारभार होत असतो, स्वच्छ आचार आणि विचार करणारी नवी पिढी घडविण्यासाठी स्वच्छता मोहिम अत्यंत महत्वाची आहे. पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सोहळा आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश राज्यभरात पोहोचणार आहे. त्यामुळे या स्वच्छता दिंडीला अनन्य साधारण महत्व आहे. केंद्राच्या स्वच्छ अभियान उपक्रमात महाराष्ट्र अव्वल असून राज्यातील ६ हजार ९३ ग्रामपंचायती, १४ तालुके व एक जिल्हा हगणदारी मुक्त झाला आहे. ही किमया लोकसहभागातून साधली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
   पालकमंत्री श्री. बापट म्हणाले, सरकारच्या कोणत्याही योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा असतो. स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातून आणि दारापासून स्वच्छतेची सुरुवात करावी.
   यावेळी प्रदीप कंद, दौलत देसाई यांची भाषणे झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता दिंडीच्या घडीपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते विधानभवन परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यभरातून आलेल्या विविध कलापथकांनी आपली कला सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिश उमडीकर यांनी केले. आभार विलास जाधव यांनी मानले. 
*****

No comments:

Post a Comment