Monday, July 25, 2016

लेख: तोंडले-मोगराळे साखळी बंधाऱ्यांमुळे मानवी जीवनाबरोबर वन्य जीवन समृद्ध !






        माण तालुक्यातील तोंडले-मोगराळे वन क्षेत्राच्या हद्दीतून वाहणाऱ्या आड ओढ्यावर वन विभागाने नऊ सिमेंट बंधाऱ्यांची साखळी उभारली. या साखळीने  माण, फलटण तालुक्यातील मानवी जीवनाबरोबरच वन्य जीवनही समृद्ध केले आहे. सध्या या बंधाऱ्यांमधून 10 टीसीएम इतका पाणीसाठा झाला असून हे पाणी ओसंडून वाहत आहे.
            माण तालुक्यामधून तोंडले आणि मोगराळे या गावाच्या वनक्षेत्राच्या हद्दीतून आड ओढा वाहत जातो. हा ओढा पावसाळ्यामध्ये भरुन त्याचे पाणी तसेच पुढे वाहून जायचे. पुन्हा हा ओढा रिकामा राहयचा. त्यामुळे पाण्याची कमतरता भासायची या ओढ्यावर वन विभागाने तोंडले हद्दीत सात तर मोगराळे हद्दीत दोन अशा नऊ सिमेंट बंधाऱ्यांची साखळी उभी केली. हे सर्व बंधारे मान्सूनपूर्व पावसानेच भरले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने हे बंधारे तुडूंब भरुन वाहू लागले आहेत. या बंधाऱ्यातून वाहनारे पाणी फलटण तालुक्यातील गावांनाही पाझर तलावाद्वारे मिळू लागले आहे.
            दहिवडीचे वनक्षेत्रपाल आर.बी. धुमाळ यांनी याविषयी माहिती दिली. आड ओढ्यातून वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे त्याचा फायदा होत नव्हता उलट परिसरातील गावांमध्ये टँकर सुरु करावे लागत असत. जलयुक्त शिवार अभियान सन 2015-16 अंतर्गत वन विभागाने तसेच प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्यासह या ओढ्याची पहाणी केली. या ओढ्यावर तोंडले आणि मोगराळे हद्दीत बंधाऱ्यांची साखळी निर्माण केली. मान्सूनपूर्व पावसानेच हे सर्व बंधारे भरले. गेल्या आठवड्यात झालेल्या मान्सुनमुळे सध्या हे बंधारे ओसंडून वाहू लागले आहेत.  या बंधाऱ्यांमध्ये 10 टीसीएम इतका पाणीसाठा झालेला आहे. या ओढ्यामुळे माण तालुक्यातील काही गावे त्याचबरोबर फलटण तालुक्यातील गावांना निश्चितपणे फायदा होणार आहे. साठलेल्या पाण्यामुळे भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. त्याचबरोबर या परिसरात सध्या लांडगे, कोल्हे, ससे, विविध पक्षी यांचा वावर वाढला आहे.
            वन विभागाने केलेल्या या कामाचा दृष्य परिणाम आता दिसू लागला आहे. माण व फलटण या दोन्ही तालुक्यांमध्ये शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी याचा फायदा होणार आहे. या पाणीसाठ्यामुळे टँकरची संख्याही आता घटली आहे. मानवी जीवनाच्या समृद्धीबरोबरच वन विभागाच्या या कामांमुळे वन्य जीवनही समृद्ध बनले आहे.

प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा

00000

No comments:

Post a Comment