Saturday, July 2, 2016

सर्वाधिक पवन सौर संकरित सयंत्र स्थापित केल्याबद्दल महाऊर्जास देशपातळीवर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार


            पुणे,दि.2 : नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (MNRE), भारत सरकार व नॅशनल इंस्टिटयूट ऑफ वींड एनर्जी (NIWE) यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्मॉल वींड एनर्जी ॲण्ड हायब्रीड सिस्टीम ॲण्ड इटस रिलिव्हन्स टू टेलीकॉम टॉवर'  या विषयावर नुकतेच एक दिवसीय कार्यशाळेचे  आयोजन महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्यावतीने (महाऊर्जा) करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागाचे सचिव उपेंद्र त्रिपाठी यांनी केले. या वेळी नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या सहसचिव श्रीमती वर्षा जोशी, महाऊर्जाचे महासंचालक श्री. नितीन गद्रे, एन.आय.इब्ल्यू.इ.चे महासंचालक डॉ. एस.गोमतीनायकम उपस्थित होते.  या कार्यशाळेत महाराष्ट्र, गुजरात, गोवा, छत्तीसगड, तामिळनाडू, मेघालय, मणिपूर, सिक्कीम या राज्यातील स्मॉल वींड एअरोजनरेटर उत्पादक, सोलर चॅनल पार्टनर, टेलीकॉम टॉवर ऑपरेटर्स, स्टेट नोडल एजन्सीचे प्रतिनिधी सहभागी झाले.
            पवन सौर संकरित सयंत्र अस्थापनेसाठी सात श्रेणींमध्ये पुरस्कार वितरीत करण्यात आले. महाराष्ट्रात सुमारे एकुण 2,133 कि.वॅ. क्षमतेची  पवन सौर संकरित सयंत्र अस्थापित झाले असून या सयंत्रांची टक्केवारी देशपातळीवरील आस्थापित क्षमतेच्या सुमारे 60 टक्के इतकी असल्याने महाऊर्जास देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करणेत आला. नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव उपेंद्र त्रिपाठी यांच्याहस्ते महाऊर्जाचे महासंचालक नितीन गद्रे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी श्रीमती वर्षा जोशी, सहसचिव, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, एन.आय.इब्ल्यू.इ. संस्थेचे महासंचालक डॉ. एस. गोमतीनायकम, श्री. ए.के. त्रिपाठी, सल्लागार, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय तसेच महाऊर्जाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक श्री. उमाकांत पांडे, प्र.महाव्यवस्थापक (ग्रा.ऊ.) श्री. हेमंत कुलकर्णी  उपस्थित होते. 
000000





No comments:

Post a Comment