Friday, July 1, 2016

हवामान बदलानुसार शेतकऱ्यांनी पीक पध्दती बदलावी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे प्रतिपादन

हवामान बदलानुसार शेतकऱ्यांनी पीक पध्दती बदलावी
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे प्रतिपादन
सोलापूर, दि. 1 : हवामान बदलानुसार शेतकऱ्यांनी पीक पध्दती बदलावी, असे प्रतिपादन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले.
हरित क्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांचा जयंती दिन राज्यात कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कृषी सप्ताह व कृषी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, जिल्हा परिषदेचे सभापती सर्वश्री मकरंद निंबाळकर, पंडित वाघ, श्रीमती ॲड. सुकेशनी देशमुख, कल्पना निकंबे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीनिवास पत्की, वित्त व लेखाधिकारी गौतम जगदाळे, जिल्हा उपनिबंधक श्री. आघाव, कृषी विकास अधिकारी गजानन ताटे आदी उपस्थित होते.
विहीर खोदण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडीच लाख रुपये मिळावेत यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांसाठी शासनाच्या ज्या - ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण जातीने प्रयत्न करणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती गायकवाड म्हणाल्या की, पर्यावरण रक्षणासाठी केवळ शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन चालणार नाही तर सामान्य माणसानेही यात पुढाकार घ्यावा त्याचबरोबर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील पीक कर्ज माफ होण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. शेतकऱ्यांनी रासायनिक शेती एैवजी सेंद्रीय शेती कडे वळावे असे सांगून जि.प. प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे यांनी स्व्‍. वसंतराव नाईक यांच्या कृषी विषयक धोरणांचा गौरव केला.
यावेळी पालकमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना सेस फंडातून शेती अवजारे तसेच मका बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते स्व. गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात वीमा योजनेच्या घडीपत्रिकेचे तसेच पीक उत्पादकतेत स्थैर्य राखत उत्पादन खर्चात बचत या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी श्री. वाघ यांनीही आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, रवींद्र माने, कृषी अधिकारी अशोक देसाई, गुरुनाथ म्हेत्रे यांच्यासह कृषी विभागाचे इतर अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment