Thursday, July 14, 2016

जलस्त्रोत, वने संरक्षित केल्यास सर्व संकटे दूर होतील -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



पंढरपूर दि. 14 – आपले जलस्तोत्र, अस्तित्वात असलेली वने संरक्षित करणे, नवीन वनांची निर्मिती ज्यावेळी आपण करु शकू त्यावेळी राज्यावरील सर्व संकटे दूर होतील आणि पांडुरंगाचा आशिर्वाद आपल्याला मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभागाच्यावतीने  आयोजित पर्यावरणाची वारी – पंढरीच्या दारी या आळंदी ते पंढरपूर पायी वारीचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री  विजय देशमुख, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, खासदार संजय पाटील, आमदार प्रशांत परिचारक, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सतिश गवई, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यावेळी उपस्थित होते.
ज्याला पर्यावरणाचं संवर्धन करता येतं  तो पांडुरंगाचा कधीही भक्त होतो, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यावर्षी निर्मल वारी करण्याचा शासनाने निर्णय घेतला. त्याअंतर्गत वारीच्या मार्गावरही मोठ्या प्रमाणात शौचालये ठेवली. पर्यावरणाची वारी आणि स्वच्छतेची वारी अशा वारींच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासोबतच स्वच्छतेचा जागरही करण्याचा प्रयत्न केला. पर्यावरणाच्या माध्यमातून वृक्षयुक्त महाराष्ट्र, वनयुक्त महाराष्ट्र तसेच जलयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शासन महत्वाची पावले उचलत आहे, असेही  मुख्यमंत्री म्हणाले.
आपली सर्वांची आई चंद्रभागा पुन्हा स्वच्छ, निर्मल, निखळ वाहणारी  करण्यासाठी नमामी चंद्रभागा हा  प्रकल्प शासनाने हाती घेतला असून त्यातून आपले जलस्त्रोत स्वच्छ करण्याचा संदेश सर्वत्र पोहोचेल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमात भारुड, पोवाडा, वारकरी आख्यान सादर केलेल्या विविध लोककलावंत आणि वारकरी पंथाच्या व्यक्तींच्या कला सादर करण्यात आल्या. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री म्हणाले की, एक लोककलाकार हाच लोकप्रबोधन करु शकतो, त्याच्या या कलेमुळे स्वच्छता, पर्यावरण आदी बाबींसाठी मोठा उपयोग होतो.
या कार्यक्रमात प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक टाळ गळ्यात घेऊन ज्ञानोबा- तुकाराम असा जयघोष केला. तसेच अमृता फडणवीस यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले. त्यानंतर त्या एका महिलेसोबत फुगडी खेळल्या. यावेळी  ‘ माझे माहेर पंढरीआणि  नाते विठ्ठलाचे’  या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. ह.भ.प.ज्ञानेश्वर  महाराज वाबळे यांनी आख्यान, चंदाबाई तिवाडी यांनी भारुड, शाहीर देवानंद माळी यांनी तसेच छोटा शाहीर पृथ्वीराज यांनी पोवाडा सादर करुन सर्वांची मने जिंकली.

                                                            0000

No comments:

Post a Comment