Thursday, July 21, 2016

“आमचं गांव, आमचा विकास” कार्यशाळेचे उद्घाटन



ग्रामीण भागाच्या शास्वत विकासासाठी
स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधींनी अभ्यासू वृत्ती बाळगावी
                                                                        ... जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद

      पुणे,दि. 21 :- राज्यघटनेतील 73 व्या घटना दुरुस्तीमुळे व चौदाव्या वित्त आयोगामुळे ग्राम पंचायतींना मोठया प्रमाणावर आर्थिक निधी प्राप्त होत आहे त्यामुळे ग्रामीण भागाच्या शास्वत विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थातील पदाधिकाऱ्यांनी अभ्यासू दृष्टीकोन ठेवल्यास ग्राम पंचायतींचा लोकसहभागीय विकास आराखडा तयार करता येईल. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण आवश्यक आहे. आमचं गांव, आमचा विकास यासारख्या कार्यशाळेतून ग्रामीण भागाच्या भविष्यातील विकासाचे नियोजन करणे शक्य आहे त्यासाठी लोकप्रतिनिंधींनी भरीव प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी आज येथे केले.
      ग्राम विकास व पंचायत राज विभाग व जिल्हा परिषद, पुणे यांच्यातर्फे ग्राम पंचायत विकास आराखडयांतर्गत जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांसाठी शरदचंद्रजी पवार सभागृहात आयोजित आमचं गांव, आमचा विकास या संचेतन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष बोलत होते. यावेळी व्यासपिठावर बांधकाम सभापती मंगलदास बांदल, महिला व बाल कल्याण सभापती श्रीमती वंदनाताई धुमाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, अंकुश बगाटे उपस्थित होते.
      याप्रसंगी उपस्थित पंचायत समिती सभापती व ग्राम पंचायत सदस्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद पुढे म्हणाले की, चौदाव्या वित्त आयोगामुळे सर्व ग्रामपंचायतींना मोठया प्रमाणावर मुक्त निधी प्राप्त होणार आहे. या निधीच्या खर्चाचे नियोजन प्रामुख्याने गावाच्या गरजा व निकड लक्षात घेऊन करावयाचे आहे. ग्रामस्तरावर लोकसहभागातून मानव विकास निर्देशांक वाढण्यासाठी या निधीचा योग्य वापर व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींनी विकास कामांचे अभ्यासपूर्ण नियोजन करुन समाजातील सर्व घटक सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावे. शास्वत विकासामध्ये स्वच्छतेला महत्व असून त्यासाठी सर्वांनी जिल्हा शौचालययुक्त करण्यासाठी  नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी लोकप्रतिनिधींना केले.
      ग्राम विकासाचा सर्व समावेशक आराखडा तयार व्हावा, त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग असावा त्यातून मानवी विकास निर्देशांक वाढावा तसेच पुढील पाच वर्षाच्या कालावधीचे गावाच्या विकासाचे नियोजन करता यावे यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी यावेळी दिली.
      उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शालीनी कडू पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये या कार्यशाळेची माहिती दिली. या कार्यशाळेस जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती, सदस्य, ग्राम विकास विभागाचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
000


No comments:

Post a Comment