Thursday, July 14, 2016

सामान्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी - खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सूचना




केंद्र पुरस्कृत विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये पुणे जिल्हा महाराष्ट्रात प्रथम
            पुणे,दि. 14 :- सामान्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी सुटसुटीत कार्यप्रणाली अवलांबी अशा सूचना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज येथे केल्या.
            जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीची बैठक विधान भवन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. समितीचे अध्यक्ष म्हणून खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिनेश डोके उपस्थित होते.
            श्री.पाटील यांनी यावेळी केंद्र शासन पुरस्कृत व जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, सांसद आदर्श ग्राम योजना, मुद्रा योजना, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना यासह विविध योजनांच्या पूर्ततेसाठी चालू आर्थिक वर्षासाठी देण्यात आलेले उद्दीष्ट व केलेली उद्दीष्टाची पूर्तता याचा अहवाल यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सादर केला. सर्व शिक्षा अभियान, केंद्रीय आदिवासी विकास विभागाकडील योजनांना अधीक निधी मिळण्यासाठी संबधित अधिकाऱ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याची सूचना यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.
            मागील कालावधीत झालेल्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर मंजूर करण्यात आलेली विविध विकास कामे त्वरित सुरु करण्यात यावी व उर्वरित विकास कामांच्या मंजूरीसाठी अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी यावेळी केले.
            पदाधिकारी व ग्रामस्थांनी केंद्र पुरस्कृत विविध योजनेच्या अंमलबजावणीमध्ये दक्ष रहावे व योजनांच्या अंमलबजाणीसाठी भरीव प्रयत्न करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी यावेळी केले.
            आमदार भिमराव तापकीर, आमदार सुरेश गोरे व आमदार दत्तात्रय भरणे तसेच पंचायत समितीच्या सभापतींनी ग्रामीण भागात सुरु असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीच्या आढाव्यात भाग घेतला व योजनांच्या अंमलबजावणीबाबत मौलीक सूचना केल्या.
            केंद्र पुरस्कृत व जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या गेल्या आर्थिक वर्षामध्ये अंमलबजावणीत पुणे जिल्हयास महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळाल्याची माहिती यावेळी ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिनेश डोके यांनी यावेळी दिली.
            बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदिप कंद, आमदार भिमराव तापकीर, आमदार सुरेश गोरे, आमदार दत्तात्रय भरणे, विविध पंचायत समित्यांचे सभापती, पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment