Thursday, July 28, 2016

पोषण आहार चळवळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उभी करा -जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे


            सातारा, दि.28 (जिमाका) : मानवाच्या जीवनात पोषण आहाराला अनन्यसाधारण महत्व आहे. अधिकाऱ्यांनी,  अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविकांनी पोषण आहार चळवळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उभी करुन त्याचे महत्व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे यांनी आज केले.
            एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत पोषण चळवळ 2016-17 जिल्हास्तरीय संवाद कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात करण्यात आले होते. यावेळी  श्री. नरळे बोलत होते. कार्यशाळेची  सुरुवात दीपप्रज्वलनाने व राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमाच्या पुजनाने करण्यात आली. या कार्यशाळेस शिक्षण सभापती सतीश चव्हाण, महिला व बाल विकास सभापती वैशाली फडतरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन.एल. थाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, राजमाता मिशनचे उपसंचालक अशोक पावडे, प्रफुल रंगारी, जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी जावेद शेख आदी यावेळी उपस्थित होते.
            लहान मुलांच्या वाढीनुसार त्यांच्या पोषण आहाराचे नियोजन करणे महत्वाचे असल्याचे सांगून श्री. नरळे पुढे म्हणाले,  मुलांमध्ये बाजारपेठेतील उपलब्ध असणारे पदार्थ खाण्याची सवय लागली आहे. त्यांना पालेभाज्यांचे महत्व सांगून त्यांना पालेभाज्या खावू घातल्या पाहिजेत. तसेच महिलांमध्ये लोहाचे प्रमाण कमी असल्याचे आढळून येत आहे. त्यासाठी कोणता आहार घेतला पाहिजे हे समजावून घेतले पाहिजे. पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविकांनी  महिलांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी कोणता आहार घेतला पाहिजे, पालेभाज्या खाल्ल्याने त्याचे  काय फायदे होतात याची जनजागृती मोठ्या प्रमाणात करावी, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
            यावेळी महिला व बाल विकास सभापती वैशाली फडतरे यावेळी म्हणाल्या, कुपोषणाबाबत समाजामध्ये प्रबोधन होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरोदर मातांसाठी विविध कार्यक्रम राबविले जात आहे. या कार्यक्रमांमधून पोषण आहाराविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.  अंगणवाड्यांमधून मुलांना आवश्यकतेनुसार पोषण आहार दिला जात आहे.  तसेच मुलांच्या मातांना पोषण आहाराविषयी सांगण्यात येत असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
            या कार्यशाळेस खंडाळा पंचायत समितीचे सभापती नितीन भरगुडे-पाटील, कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील,  जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी पर्यवक्षिका, अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

            

No comments:

Post a Comment