Friday, July 22, 2016

मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई - रवींद्र कदम-पाटील


                सातारा, दि.22 (जिमाका)महाविद्यालयांनी 1 नोव्हेंबर 2003 च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी व डोनेशन घेवू नये. जी महाविद्यालये फी घेणार आहेत, अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त रवींद्र कदम-पाटील यांनी दिली.
                मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी न घेण्याबाबत वारंवार या कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना कळविण्यात आले होते. तरी सुद्धा काही महाविद्यालये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी व डोनेशन वसुल करीत असल्याबाबतच्या तक्रारी कार्यालयास प्राप्त होत आहेत. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी व डोनेशन घेवू नये, विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करु नये तसेच कागदपत्रांसाठीही अडवणुक करु नये. जे महाविद्यालय फी घेणार आहेत अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येणार आहे.
                महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने या कार्यालयामार्फत अनु जाती, विजाभज, इमाव, विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार‍ शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी, राजर्षि छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, विद्यावेतन इत्यादी योजनांचा लाभ देण्यात येतो. सर्व योजना शासनामार्फत ऑनलाईन राबविण्यात येत आहेत.
                सन 2015-16 पुर्वीचे जे अर्ज अद्यापही महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत असे पात्र असलेलेच अर्ज या कार्यालयाच्या लॉगीनला फॉरवर्ड करुन तपासणीसाठी या कार्यालयात उपलब्ध करुन द्यावेत. महाविद्यालयांनी अपूर्ण अर्ज कोणत्याही परिस्थितीत या कार्यालयाच्या लॉगीनला फॉरवर्ड करु नयेत. तसेच ज्या महाविद्यालयांनी ऑनलाईन अर्ज कार्यालयाच्या लॉगीनला सोडलेले आहेत परंतु हार्ड कॉपी तपासणीसाठी उपलब्ध करुन दिलेले नाही त्यांनी अर्जांची हार्ड कॉपी, अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे, स्टेटमेंट बी, प्रमाणपत्रांसह तपासणीसाठी या कार्यालयाकडे सादर करावेत.
                ज्या अर्जांना या कार्यालयाकडून त्रुटी लावलेल्या आहेत त्याबाबत विद्यार्थ्यांना कळविण्यात याव व जे विद्यार्थी अर्जांची त्रुटीपुर्तता करणार नाहीत असे सर्व अर्ज तात्काळ ऑनलाईन रिजेक्ट करावेत. कोणत्याही परिस्थितीत अर्ज ऑनलाईन प्रणालीमध्ये प्रलंबित दिसता कामा नये, अन्यथा त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील.
                2016-17 हे शैक्षणिक वर्ष सुरु आहे. थोड्याच कालावधीत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा सुरु होत आहे. सर्व महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की, ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे महाविद्यालयांनी सर्व प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज महाविद्यालयातच भरुन घ्यावेत. त्यासाठी महाविद्यालयांनी त्यांच्या दर्शनी भागावर नोटीस लावावी. तसेच प्रत्येक वर्गात नोटीसही फीरविण्याची व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारे तक्रार होणार नाही याची दक्षता घ्यावी. तक्रारी झाल्यास होणाऱ्या नुकसानीस महाविद्यालय जबाबदार राहील, असेही श्री. कदम- पाटील यांनी कळविले आहे.
0000

No comments:

Post a Comment