Tuesday, July 5, 2016

संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन



                सातारा दि. 5 (जि.मा.का): संत शिरोमणी  श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज दुपारी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठया आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले.  फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि  हरिभजनात तल्लीन होऊन संत श्री ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब होऊन गेला.
                संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्या वतीने आमदार मकरंद पाटील,जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष रवी साळुंखे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु देवानंद शिंदे, पंचायत समितीचे सभापती नितनी भरगुडे-पाटील आदींसह विविध पदाधिकारीमान्यवर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
                नीरा नदीतील स्नानानंतर संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवरांनी  तसेच लाखो भाविकांनी  दर्शन घेतले. माऊलीच्या  दर्शनासाठी भाविकांनी  एकच गर्दी केली होती.  हरिनामाच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात पालखी सोहळ्यात भाविक तल्लीन झाले होते. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेली झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देणारी जनजागृती दिंडी सर्वांचे लक्ष वेधुन घेत होती. यामध्ये आरएसपीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

000000

No comments:

Post a Comment