Saturday, July 23, 2016

सहकारी पतसंस्थांनी बहुउद्देशीय वित्तीय तंत्राचा अवलंब करावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






पुणे 23, - सहकारी पतसंस्था, वित्तीय संस्थांनी बहुउद्देशीय वित्तीय तंत्राचा अवलंब करुन व्यावसायीकता अंगिकारल्यास त्यांची उत्तरोत्तर आर्थिक प्रगती होईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपिठावर अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, आमदार मेधाताई कुलकर्णी, संस्थेचे माजी अध्यक्ष श्रीकृष्ण तथा बाळासाहेब फडणवीस, बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक आर.सी.गुप्ता, माजी अध्यक्ष डॉ.वसंतराव पटवर्धन उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आर्थिक विकेंद्रिकरणातून छोटया छोटया सहकारी संस्था उभ्या राहिल्या. त्यामुळे सामान्य नागरिकांपर्यत सहकार पोहोचला. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. समजाहिताच्या भावनेने आणि सामाजिक जाणिवेतून संस्था चालविल्यास त्यास यश नक्कीच मिळते. पंतप्रधान जन-धन योजनेद्वारे देशभरात सुमारे 22 कोटी 50 लाख खाती विविध बँकामध्ये सुरु झाली. त्यामुळे चाळीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम या खात्यांमध्ये जमा झाली. यामुळे नागरिकांना मोठया प्रमाणावर अर्थव्यवस्थेची फळे चाखता आली. समाज आणि नागरिकांना प्रगती करायची असेल त्यासाठी त्यांना वित्तीय संस्थांचे पाठबळ आवश्यक आहे. संस्थेने आपल्या कार्यात व्यावसायीकतेचा अवलंब केल्यास वित्तीय आव्हानांवर मात करता येईल असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
प्रामणिकता आणि राष्ट्रवाद स्विकारुन कर्मचारी पतसंस्था सुरु केली आणि ती मोठया प्रमाणावर यशस्वी केल्याबद्दल तसेच संस्थेमध्ये जमा झालेल्या भांडवलाचे योग्य नियोजन करुन गुंतवणूक केल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
 बँका समाजातील सर्व घटकांना विविध प्रकारची मदत करत असतात त्याचप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने सभासदांना आणि समाजातील घटकांना मदत केल्याबद्दल पालकमंत्री गिरीश बापट यांनी संस्थेच्या संचालकांचे अभिनंदन केले.
जलयुक्त शिवार योजनेसाठी संस्थेतर्फे 10 लाखाची मदत
            सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून समाजाचे ऋण फेडण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्यावतीने जल युक्त शिवार योजनेसाठी 10 लाख रुपये मदतीचा धनादेश संचालक मंडळाने यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
            कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्याहस्ते दिप प्रज्वलनाने झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांना संस्थेच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. माजी संचालक वसंत खरे यांचा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सन्मानचिन्ह देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, बँक ऑफ महाराष्ट्राचे वरिष्ठ अधिकारी, संस्थेचे सर्व संचालक, पदाधिकारी, सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
0000


No comments:

Post a Comment