Thursday, July 28, 2016

ग्राहकांच्या प्रबोधनासाठी मार्केट यार्ड येथे भव्य शिबीराचे आयोजन

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पुढाकार

पुणे, दि.28:दुध, अन्न, औषधे, खाद्य पदार्थ यामध्ये असलेली भेसळ आणि वजनमापामधील फरक अशा प्रकारच्या असंख्य ग्राहकोपयोगी गोष्टींवर ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करणे, ग्राहकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास अशा तक्रारीचे निराकरण योग्य प्रकारे करणे, सोबतच छोटया-छोटयाबचतीतून भविष्यात हुशार गुतवणुकदार कसे बनावे यांचे मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पुढाकाराने भव्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.          कंझुमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा शाखेच्यावतीने      शनिवार दि. 6 ऑगस्ट,2016 रोजी सकाळी 10-30 ते 3-30 या कालावधीत संयुक्तरित्या हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये दूध तपासणीवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या शिबीरामध्ये ग्राहकांजवळील बचतीचे लवकरात लवकर योग्य फायदेशीर गुंतवणूकीचे व्यवस्थापन कसे करावे यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. वित्तीय संकल्पना आणि धोरण, वित्तीय उत्पादने, म्युच्युअल फंड आणि शेअर्स मधील फरक, गुंतवणूकीची फायदेशीर योजना कशी निवडावी, आर्थिक अफवांपासून आपले संरक्षण कसे करावे, आयुर्विमा किंवा वैद्यकीय विमा कसा यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
          या शिबीरात दूध परीक्षणावर माहिती दिली जाणार आहे. या कार्यशळेसाठी लागणारी दूध परीक्षण यंत्रणा आणि त्याचे परीक्षण करुन त्याचा अहवाल संबधीतास चाळीस सेकंदात दिला जातो.
          शिबिरात दाखल करण्यात आलेल्या प्रत्येक तक्रारीची छाननी करुन तक्रारदारास त्या क्षेत्रातील तज्ज्ञ सभासदांकडे पाठविली जाते. सभासद ग्राहकांच्या तक्रारी गांभिर्याने ऐकून घेतात. त्यानंतर सदरील तक्रार संबंधित विभागाकडे निराकरणासाठी पाठविल्या जावून त्यांचा पाठपुरावा देखील केला जातो.
            शेतीसाठी शासनाने पुरविलेले सोलर आणि पंप मिळणे, घराच्या बांधकामाचे योग्य पैसे भरुन सुध्दा बांधकाम व्यवसायिक घराचा ताबा देण्यास टाळाटाळ करणे, बॅकेच्या कर्जाचे हप्ते भरुनसुध्दा बॅकेचे हप्ता भरल्याचे पत्रक मिळणे. वैद्यकीय विम्याचे पैसे मिळणे किंवा त्यामध्ये कपात करणे, नवीन घेतलेल्या दागिन्यांमध्ये नमूद केलेली शुध्दता नसणे, वीज मिटर योग्य प्रकारे चालणे, तक्रार करुनसुध्दा त्याची दखल घेणे, मोबाईल, कॉम्पुटर, घरगुती वीज उपकरणे हमी दिलेल्या कालावधीत बिघडणे, त्याची दखल उपकरण बनविणारी कंपनीने घेणे, छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीत वस्तू विकणे अशाप्रकारच्या तक्रारी शिबीरात सोडविण्यात येतात.


या शिबिरात सामील होण्यासाठी शासनातर्फेसंस्थेच्या माध्यमातून टोल फ्री मदत सेवा (हेल्प लाईन) उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचा क्रमांक 1800222262 आहे. सकाळी 10-00 ते सायंकाळी 5-00 वाजेपर्यत ही सेवा उपलब्ध राहणार आहे. mah.helpline@gmail.com  या - मेलद्वारेसुध्दा शिबिरात ग्राहकांना सहभागी होता येईल. एसएमएसद्वारे 9773336400 या मोबाईलवर तक्रार करता येईल. सदर संस्थेच्या अधिकृत पत्त्यावरसुध्दा लिखीत तक्रारी स्विकारल्या जातातग्राहकांच्या तक्रारींची नोंदणी झाल्यावर सदर तक्रारीसंदर्भात पत्रव्यवहार करण्यासाठी रुपये 150/- एवढे शुल्क आकारले जाते. या ग्राहक मार्गदर्शन भव्य शिबीरास नागरीकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून त्यांच्या समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकरी सौरभ राव यांनी केले आहे.
*****


No comments:

Post a Comment