Thursday, July 21, 2016

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणीबाबत कार्यशाळा संपन्न

   
                सातारा, दि.21 (जिमाका):सातारा जिल्हा परिषद प्राथमिक विभागामार्फत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी व सर्व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांची कार्यशाळा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संपन्न झाली.
                या कार्यशाळेत शिक्षण सभापती सतीश चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव, उपशिक्षणाधिकारी एच.व्ही. जाधव, गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, धनंजय चोपडे आदी यावेळी उपस्थित होते.
                या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना श्री. चव्हाण म्हणाले, सातारा जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा कसा उंचावेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. ग्रामीण भागात जास्तीत जास्त दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे काम चांगले असून जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारत आहे. पटसंख्येमध्ये वाढही झालेली आहे, असेही ते म्हणाले.
                पुनिता गुरव यांनी सर्वांचे स्वागत करुन त्या म्हणाल्या, मुले शंभर टक्के शाळेत आली पाहिजेत, शिकली पाहिजेत व टिकली पाहिजेत. प्रत्येक मुल प्रगत झाले पाहिजे. तसेच स्वच्छ शाळा, स्वच्छ विद्यालय, वृक्षारोपण, पाठ्यपुस्तके, गणवेश वाटप, एसटीएस परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, हँडवॉश स्टेशन सर्व शिक्षा अभियानांतर्गत येणाऱ्या योजनांबाबत त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
                तसेच उपशिक्षणाधिकारी श्री. जाधव यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत करावयाच्या कार्यवाहीबाबत  व गुणवत्ता वाढीसाठी राबवावयाच्या उपक्रमाबाबत यावेळी मार्गदर्शन केले.
0000

No comments:

Post a Comment