Thursday, July 14, 2016

शेतमालाची बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हाती हवी




शेतमालाची बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हाती हवी
मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन : कृषी पंढरी प्रदर्शनाचे उद्घाटन

         पंढरपूर दि. 14 – शेतमालाची बाजारपेठ शेतक-यांच्या हातात असायला हवी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
           मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज कृषी पंढरी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले . यावेळी ते बोलत होते. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर होते. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री तथा राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आदी उपस्थित होते.
            कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत सावता माळी कृषी नगरीच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या, या प्रदर्शनात चारशेहून अधिक कंपनी सहभागी झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने कृषी पंढरी सारखे प्रदर्शन आयो‍जित करुन आमदार प्रशांत परिचारक यांनी अतिशय चांगला उपक्रम राबवला आहे. या पंढरीतून कृषी विषयक तंत्रज्ञान राज्यभरातील शेतक-यांच्या शिवारापर्यंत पोहोचेल .
       मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमनातून काही  कृषी उत्पादने नियमनमुक्त करण्यात आली आहेत. शेतक-यांच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण शेतमाल पिकवणा-या शेतक-याला आपल्या उत्पादीत मालाचा भाव ठरवता येत नाही. नियमनमुक्तीमुळे शेतकरी आपल्या मालाचा भाव ठरवू शकेल आणि त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळेल .
            बाजारपेठ शेतक-यांच्या हितासाठी कार्यरत असायला हवी. पण काही कारणांमुळे ही बाजारपेठ शेतक-यांच्या फायद्याची नसल्याचे स्पष्ट होते. वास्तविक राज्य शासनास बाजारपेठ ही शेतक-यांच्या हिताची व्हावी, असे वाटते त्यामुळेच काही कृषी उत्पादने नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
         कृषी क्षेत्रात गुंतवणूक होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य शासनाने गेल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी 25 हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील जास्तीत जास्त जमीन ठिबक सिंचनाखाली आणण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्याअंतर्गत  येत्या वर्षभरात चार लाख हेक्टर जमीन ठिबक सिंचनाखाली आणण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री विजय देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचीही भाषणे झाली.
            प्रास्ताविक आमदार परिचारक यांनी केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी प्रदर्शनातील विविध स्टॉलना भेट देवून पाहणी केली.

                                                                        0000

No comments:

Post a Comment