Friday, July 1, 2016

वृक्ष लागवड जनतेची चळवळ झाली पाहिजे : पालकमंत्री बापट





पुणेदि. 1 : वृक्ष लागवड हा शासनाचा किंवा वन विभागाचा कार्यक्रम न राहता  जनतेची चळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली.
            2 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या वारजे येथील वन उद्यानात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.  यावेळी आ. मेधा कुलकर्णी, आ. भिमराव तपकीर, सिनेअभिनेते जॅकी श्रॉफ, संगीतकार सलील कुलकर्णी,  मुख्य वनसंरक्षक जितसिंह  आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी बोलताना पालकमंत्री बापट म्हणाले की 2 कोटी वृक्षारोपणाचा शासनाचा महत्वकांक्षी कार्यक्रम आज सर्वत्र केला जात आहे.  अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्साहाने झाडे लावतो पण लावलेलं झाड  टिकले पाहिजे.   केवळ झाड लावणे नाही तर  जगविणे टिकविणे   महत्वाचे आहे.  वन खात्याबरोबरच इतर शासकीय विभाग, विद्यार्थी,  विविध संस्था यामध्ये सहभागी झाल्या आहेत.  जिल्ह्याचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होईल. यामाध्यमातून वृक्ष लागवड चळवळ सरकारची नाही तर जनतेची झाली पाहिजे असे प्रतिपादन केले.
               याप्रसंगी बोलतांना आ. भिमराव तापकीर म्हणाले की, मागील वर्षी येथे वनउद्यान सुरु केले आहे.  निसर्गाचा समतोल टिकविण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा यशस्वी करण्याचे आवाहन केले.  तर आ. मेधा कुलकर्णी यांनी वारजे येथील टेकडी यापुढे पर्यटन स्थळ होईल अशी आशा व्यक्त केली तसेच पुणे शैक्षणिक नगरी, सांस्कृतिक शहर प्रदुषणमुक्त असले पाहिजे असे प्रतिपादन केले.
               सदरील कार्यक्रमात सिनेअभिनेता जॅकी श्रॉफ म्हणाले की आज 'डॉक्टर डे' आहे.  झाड हेच खरे डॉक्टर आहे.  ऑक्सीजनसाठी झाडे लावणे अत्यंत गरजेचे आहे.  यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले तर संगीतकार सलील कुलकर्णी यांनी राज्य शासनाने व  वनमंत्री  यांनी आपल्यासाठी वृक्ष लागवड उपक्रम राबविला आहे.  याबाबत त्यांचे आभार मानले.
               पालकमंत्री गिरीश बापट, उपस्थित मान्यवर, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.   याप्रसंगी निसर्गप्रेमी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आदिंनी वृक्षारोपण केले.
*****

No comments:

Post a Comment