Saturday, July 23, 2016

संविधानाच्या माध्यमातून स्वराजाकडून सुराज्याकडे जाण्याचा प्रयत्न करू या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






पुणे दि. 23 (विमाका): लोकमान्य टिळकांच्या मार्गाने संविधानाच्या माध्यमातून स्वराज्याकडून  सुराज्याकडे जाण्याचा प्रयत्न करुन टिळकांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करूया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
            येथील टिळक स्मारक सभागृहात ‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि ते मी मिळविणारच’ या घोषणेच्या शताब्दी समारंभात, ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री दिलीप पाडगांवकर, किरण ठाकूर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, की लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळविणारच या घोषणेव्दारे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला ऊर्जा दिली, स्वातंत्र्यवीरांना, क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. 1857 चा स्वातंत्र लढा इंग्रजांनी मोडून काढला. त्यानंतर देशात लढण्याची प्रवृती कमी झाल्याचे जाणवत होते, नैराश्य निर्माण झाले होते. समाजातील मोठा वर्ग इंग्रजाशी लढून यशस्वी होवू शकत नाही अशा मानसिकतेत होता. त्यांच्यामध्ये टिळकांच्या या खणखणीत वाक्याने प्रेरणा तयार झाली, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
            लोकमान्य टिळकांनी 25/30 वर्षे समाजात अभिसरण, एकत्रीकरण झाले पाहिजे. यासाठी व्यापक उपक्रम हाती घेतले. वृत्तपत्रातील लेखनाद्वारे ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय’ असे शक्तिशाली विचार मांडून प्रबोधन केले. ताकत दिली. अशा या महापुरुषांचे विचार नवीन पिढीपर्यंत जाण्यासाठी या शताब्दीच्या निमित्ताने पुस्तके, ई-बुकद्वारे पोहचविण्याचे चांगले कार्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना धन्यवाद दिले.
            लोकमान्य टिळकांनी त्या काळात मांडलेला स्वदेशीचा विचार आणि आजचा स्वदेशीचा विचार यामध्ये फरक आहे. आज ‘मेक इन इंडिया’ हा विचार महत्वाचा आहे. लोकमान्यांचे स्वदेशी,स्वावलंबन, राष्ट्रीय शिक्षणाचे विचार आजही महत्वाचे आहेत. या शताब्दी वर्षात लोकमान्य टिळकांना अपेक्षित गणेशोत्सव साजरा व्हावा. विविध उपक्रम साजरे करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. याद्वारे लोकमान्य टिळकांचे विचार पुन्हा सामान्यांपर्यंत पोहचवले जातील. महापुरुषांचे विचार कधीही कालबाह्य होत नाहीत, असे विचारं मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी मांडले.
            यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले की, ‘लोकमान्य टिळकांचा स्पष्टवक्तेपणा, सत्यप्रीयता, देशभक्ती, प्रचंड स्वातंत्र्य प्रेम आदी गुणांचा नवीन पिढीने अंगीकार केला पाहिजे. त्यांनी स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण हे चार मंत्र दिले. या मंत्रांचा नवीन अर्थ बदललेल्या संदर्भात लावला पाहिजे, असेही ते म्हणाले.
            या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगांवकर लिखित ‘टिळक इन आवर टाईम्स’ छायाचीत्रांकित तसेच चरित्राचे आणि ई-बुकचे प्रकाशनही मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. मुक्ता टिळक यांनी आभार मानले.

****

No comments:

Post a Comment