Friday, July 29, 2016

जलयुक्त विसापूरची ठिबकयुक्त आणि खोरेमुक्तीकडे वाटचाल





          टंचाईग्रस्त म्हणून ओळख असणाऱ्या खटाव तालुक्यातील डोंगर कपारीत वसलेल्या विसापूरकरांनी लोकसहभागाची ताकद काय असते, ते शासनाचे जलयुक्त शिवार अभियान राबवून दाखवून दिले आहे. मोठ्या प्रमाणातील लोकसहभाग, श्रमदान व शासनाच्या मदतीने जलयुक्त शिवार अभियानाची कामे संघटीतपणे केल्याने आज विसापूरच्या शिवारात जागो जागी पाण्याचे साठे पहायला मिळत आहेत. जलयुक्त बनलेल्या विसापूरची ठिबकयुक्त आणि खोरेमुक्तीकडे जाणारी वाटचाल निश्चितच प्रेरणादायी बनेल.
                डोंगर कपारीत वसलेल्या विसापूरची लोकसंख्या अवघी 5 हजार. गावचे पर्जन्यमान सरासी 650 ते 700 मि.मी. गावामध्ये 576 हेक्टर बागायत क्षेत्र, 650 जिरायत क्षेत्र तर पडीक क्षेत्र व डोंगर माथा ते पायथा 417.87 हेक्टर असे एकूण 1644.67 हेक्टर भौगोलीक क्षेत्र. गावामध्ये असणारे राम ओड्याचे तसेच गाव ओड्याचे  लोक वर्गणीतून रुंदीकरण व खोलीकरण केले. या ओड्यांवर 16 वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून 2.25 कोटी लिटर पाणी अडविले गेले आहे. लोक वर्गणी, कृषी विभाग, यांत्रिकी विभाग यांच्या मदतीने माथा ते पायथा या संकल्पनेनुसार गावामध्ये 450 हेक्टर डीपसीसीटी पूर्ण केलेली आहे.
                इजाळीमधून 7 हजार 440 क्युबीक मिटर, वाणदरामधून 9920 क्युबीक मिटर, आवारवाडीमधून 8080 क्युबीक मिटर तर कोकाटेमधून 3200 क्युबीक मिटर अशा चार पाझर तलावांमधून एकूण 28 हजार 640 क्युबीक मिटर गाळ लोकसहभाग व यांत्रिकी विभाग आलोरे यांच्या मदतीने काढण्यात आला. हा गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये टाकून शेत जमिनही वहिवाटीत आणली आहे.  लोकवर्गणीतून 6 माती नालाबांधमधून गाळ काढून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढविली आहे.  लोकवर्गणीतून 5 सिमेंट बंधाऱ्यांतील गाळ काढला आहे. रोजगार हमी योजनेतून 5 विहिरींचे पुनर्भरण व 2 विंधन विहिरींचे पुनर्भरण करण्यात आले आहे.  
गाव ठिबकयुक्त आणि खोरेमुक्त करणार - सरपंच
          जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांच्या प्ररेणेने जनजगृती करुन लोकसहभागातून 16 वनराई बंधारे बांधून सुमारे अडीच कोटी लिटर पाणीसाठा निर्माण केला आहे. अवघ्या दीड महिन्यात 450 हेक्टर सीसीटीचे काम पूर्ण केले. यामध्ये यांत्रिकी विभागामार्फत 100 ते 110 हेक्टर आणि उर्वरित लोकसहभागातून करण्यात आलेले आहे. सध्या गावामध्ये कृषी विभागा आणि स्थानिकस्तर यांच्या माध्यमातून 14 सिमेंट बंधारे उपलब्ध झाले आहेत. गावामध्ये निर्माण झालेला पाणीसाठा काटकसरीने वापरण्यासाठी गाव ठिबकयुक्त आणि खोरे मुक्त करत आहोत. यासाठी ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत असल्याची भावना सरपंच सागर साळुंखे यांनी बोलून दाखविली.
                गणपत साळुंखे (शेतकरी) ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि शासनाच्या सहकार्याने गावामध्ये भरपूर कामे झाली. त्या माध्यमातून जागोजागी पाणी साठलयं. याच पाण्यावर माझी चार एकर जमीन भिजतीय. निर्माण झालेले पाणी  अधिककाळ टिकण्यासाठी माझी शेती सध्या मी ठिबकवर केली आहे.
                राजेंद्र साळुंखे (अध्यक्ष विकास सेवा सोसायटी)  वनराई बंधाऱ्यांपासून गावचा कायापालट करण्यासाठी सुरुवात केली आणि गावं कामाला लागले. खरोखर गाव  काम करते का नाही हे पाहण्यासाठी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला हे भेटी  देत. गावाने केलेले काम पाहून आणखी 14 सिमेंट बंधारे मिळाले आहेत. या बंधाऱ्यांमधून 1130 टीसीएम पाणीसाठा होणार असून 700 हेक्टर जमीन पाण्याखाली येईल. सध्या गाव 100 टक्के ठिबकवर करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे.
                टंचाईमुक्तीचा शिक्का विसापूरकरांनी आपल्या कामातून पुसून टाकला आहे. जलयुक्तकडून ठिबकयुक्तकडे आणि खोरे मुक्तीकडे विसापूरची वाटचाल ही अन्य गावांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

  - प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा

00000

No comments:

Post a Comment