Saturday, July 23, 2016

ई-कम्प्लेंट नोंदविण्याची सुविधा प्रायोगिक तत्वावर पुण्यात सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस







सीसीटीएनएस राबविण्यात महाराष्ट्र देशातील पहिले राज्य


पुणे, दि. २३ (विमाका): क्राईम अॅन्ड क्रिमिनल ट्रॅकींग नेटवर्क सिस्टीम (सीसीटीएनएस) पूर्णतः कार्यान्वित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्यातील नागरिकांना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावयाची असल्यास आता ई-कम्प्लेंट हे ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून देण्यात येणार असून पथदर्शी प्रकल्प म्हणून पुणे शहरात याची सुरवात करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
१४ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचा समारोप कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्याचे पोलीस महासंचालक (कायदा व तंत्रज्ञान) प्रभात रंजन, पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजयकुमार, राज्याचे कारागृह महानिरीक्षक तथा अप्पर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय, विशेष पोलीस महानिरीक्षक (गुन्हे) रितेश कुमार आदी याप्रसंगी उपस्थित होते.
सीसीटीएनएसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात डाटा तयार होतो आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, यामुळे गुन्हेगारांचा शोध घेण्याबरोबरच गुन्ह्याची उकल करण्यासाठी आपल्याला मोठी मदत होते. तंत्रज्ञानात गुन्हेगारांच्या दोन पाऊले पुढेच आपल्याला राहिले पाहिजे. आपल्याला गुन्हेगारांच्या ठस्यांचाही मोठा डाटा तयार करायचा आहे. यामाध्यमातून सर्व प्रकारच्या गुन्हेगारांचा डाटा आपल्या हातात आल्यास गुन्हे रोखण्यासाठी खूप उपयोग होईल. सीसीटीएनएस यंत्रणेसाठी सध्या उपलब्ध असलेला इंटरनेटचा वेग कमी असून तो १० एमबीपीएस पर्यंत निश्चितच वाढविण्यात येईल, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘आपली तक्रार नोंदवून घेतली जात नाही. अशाप्रकारच्या तक्रारी नागरिक करत असतात. यावर उत्तम उपाय महाराष्ट्र पोलिसांनी तयार केला आहे. ई-कम्प्लेंटच्या माध्यमातून नागरिक ऑनलाईनरित्या आपली तक्रार राज्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात नोंदवू शकतात. त्याची खात्रीही लगेचच होऊ शकते. तसेच एसएमएस गेटवेच्या माध्यमातून नागरिकाला आपल्या तक्रारीची सद्यस्थिती वेळोवेळी मिळणार असल्याने नागरिकांचे पोलीस ठाण्यातील फेऱ्या आणि वेळ वाचेल. सध्या ई-कम्प्लेंट यंत्रणा पथदर्शी स्वरूपात पुणे शहरासाठी सुरु करण्यात येत असून त्यातील येणाऱ्या अडचणी, त्रुटी दूर करून लवकरच संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल. सीसीटीएनएस आणि ई-कम्प्लेंट याचे मोबाईल अॅप लवकरच तयार करावे, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
गुन्ह्यांच्या तपासामध्ये शास्त्रीय पुरावे अत्यंत महत्वाचे असतात, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यासाठी व्यावसायिक पद्धतीने गुन्हे अन्वेषण केले पाहिजे. यातील प्रत्येक बाबींमध्ये अचूकता आल्यासच लवकरात लवकर गुन्ह्यांची उकल आणि त्यांनतर शिक्षा या बाबी शक्य होतील. राज्यातील न्यायवैद्यक प्रयोगशाळांची सुधारणा करण्यास शासन प्राधान्य देत आहे. प्रयोगशाळांमध्ये हस्ताक्षर तज्ज्ञांचा मोठा अनुशेष आहे. तो दूर करण्यासाठी औरंगाबाद येथील एका प्रशिक्षण संस्थेकडून मदत घेण्यात येईल.
यावेळी पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये न्यायवैद्यक शास्त्राच्या दृष्टीकोनातून घेण्यात आलेल्या स्पर्धेत विजेते ठरलेल्या संघांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. पुणे शहर पोलिसांनी यावर्षीची उत्कृष्ट टीमचा मान  आणि सर्वसाधारण विजेतेपद मिळविले तर द्वितीय क्रमांक कोल्हापूर परीक्षेत्राने मिळविले.
विशेष पोलीस महानिरीक्षक (गुन्हे) रितेश कुमार यांनी प्रास्ताविक केले. अपर पोलीस महासंचालक संजयकुमार यांनीही संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १५ मोबाईल फोरेन्सिक इन्वेस्टीगेशन व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. त्यानंतर त्यांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध उपकरणांची पाहणी केली.
****


No comments:

Post a Comment