Wednesday, September 28, 2016

स्तन कर्करोग जागृती मोहिम 1 ऑक्टोबर रोजी शुभारंभ


पुणे, दि. 28 (विमाका) :  महिलांमध्ये स्तन कर्करोगाबाबत जागृती होण्यासाठी आणि त्यासंबंधीची तपासणी विनामूल्य उपलब्ध होण्याच्या उद्देशाने ऑक्टोबर 2016 हा महिना जागतिक स्तन कर्करोग जागृती महिना म्हणून राज्यभर साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या सहसंचालकांनी दिली आहे.
देशातील महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. 2012 मध्ये स्तन कर्करोगाचे देशभरात एक लाख 45 हजार नवे रुग्ण आढळून आले होते. याच काळात 70 हजार रुग्ण दगावल्याची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत मध्यम व अल्प उत्पन्न असलेल्या देशांमधील 52 टक्के महिलांमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आली आहेत. 2020 साली हे प्रमाण 77 टक्क्यांपर्यत असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावर उपाय म्हणून समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रात शहरी भागांबरोबरच ग्रामीण व आदिवासी बहुल भागामध्येही स्तन कर्करोगाचे प्रमाण चिंताजनक आहे. प्राथमिक अवस्थेत या कर्करोगाचे निदान केले गेल्यास पूर्णपणे इलाज करणे शक्य होते.मात्र आजाराबाबत अपूर्ण माहिती व अज्ञानामुळे स्तन कर्करोगाचे वेळेत निदान आणि उपचार न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावल्याचे चित्र पहावयास मिळते. यासाठीच या जागतिक स्तन कर्करोग जागृती महिन्यामध्ये सर्वसामान्यांमध्ये या आजाराविषयी प्रबोधन करण्यात येणार आहे.
या उपक्रमात वैद्यकीय शिक्षण विभागाबरोबरच इम्पॅथी फौंडेशन संस्थेद्वारे अद्ययावत स्तन कर्करोग तपासणी यंत्र प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या सर्व ठिकाणी विनामुल्य स्तन कर्करोग तपासणी प्रशिक्षण व उपचार शिबिराचे उद्घाटन 1 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात येणार आहे.

00000

No comments:

Post a Comment