Wednesday, September 21, 2016

अनुसूचित जाती उपयोजनेसाठी (विशेष घटक योजना) यंदा १९६ कोटींची तरतूद योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन



पुणे, दि. २१ (विमाका): अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न वाढवून त्यांना दारिद्रय रेषेच्यावर आणण्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या अनुसूचित जाती उपयोजनेसाठी (विशेष घटक योजना) चालू आर्थिक वर्षात १९६ कोटी ३४ लाख ३१ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी केले आहे.
            अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) १९९२ पासून राज्यात राबविण्यात येते. २०१६-१७ च्या निधीच्या कार्यक्रमास  प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली असून हा निधी जिल्हा स्तरावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना जमीन सुधारणा, निविष्ठा पुरवठा, पिक संरक्षण/शेतीची सुधारित अवजारे, बैलगाडी, बैलजोडी/रेडेजोडी, इनवेल बोअरिंग, जुनी विहीर दुरुस्ती, पाईपलाईन, पंपसंच, नवीन विहीर, शेततळे, परसबाग लागवड, तुषार/ठिबक सिंचन संच आणि ताडपत्री या बाबींचा विहित अनुदान मर्यादेत लाभ देण्यात येतो.
            राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येते. योजनेचे पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहेत. लाभार्थी अनुसूचित जाती, नवबौद्ध वर्गातील असावा, जमिनीचा ७/१२ व ८-अ चा उतारा जोडणे आवश्यक, दारिद्रय रेषेवरील शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांच्या मर्यादेत उत्पनाचा दाखला सादर करणे बंधनकारक, लाभार्थ्यांची जमीनधारणा ६ हेक्टरपेक्षा कमी असणे बंधनकारक आहे. योजनेच्या लाभासाठी दारिद्रयरेषेखालील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी व तालुका स्तरावर पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी आणि कृषी अधिकारी यांच्यामार्फत या योजनेची अंमलबजावणी होते.
लाभार्थ्यांना पुढील १४ बाबींवर अनुदान अनुज्ञेय असून लाभार्थ्यांच्या मागणीनुसार आवश्यक त्या घटकांचा लाभ देण्यात येतो. जमीन सुधारणा (१ हेक्टर मर्यादेत)-४० हजार रुपयांपर्यंत, निविष्ठा वाटप (१ हेक्टर मर्यादेत)-५ हजार रुपये मर्यादेत, पिक संरक्षण, शेतीची सुधारित अवजारे-१० हजार रुपयांपर्यंत, बैलजोडी/रेडेजोडी-३० हजार रुपयांपर्यंत, इनवेल बोअरिंग-२० हजार रुपयांपर्यंत, जुनी विहीर दुरुस्ती-३० हजार रुपयांपर्यंत, पाईपलाईन (३०० मीटर पर्यंत)-२० हजार रुपयांपर्यंत, पंपसंच-२० हजार रुपयांपर्यंत, नवीन विहीर (रोहयो योजनेनुसार)-७० हजार ते एक लाख रुपयांच्या मर्यादेत, शेततळे-३५ हजार रुपयांच्या मर्यादेत, परसबाग लागवड-२०० रुपये प्रती लाभार्थी, तुषार/ठिबक सिंचन संच पुरवठा-२५ हजार रुपये प्रती हेक्टरच्या मर्यादेत आणि ताडपत्री-१० हजार रुपये प्रती लाभार्थ्यांच्या मर्यादेत.
नवीन विहीर घटकांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना उच्चतम लाभ मर्यादा ७० हजार रुपये ते एक लाख रुपयांपर्यंत अनुज्ञेय आहे. या लाभार्थ्यांना इतर घटकांचा लाभ अनुज्ञेय नाही. नवीन विहीर घटकाव्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना ५० हजार रुपये मर्यादेपर्यंत अनुदान अनुज्ञेय आहे. योजनेचा लाभ लाभार्थ्यास दोन आर्थिक वर्षात देण्यात येतो, असेही कृषी आयुक्तालयाकडून कळविण्यात आले आहे.
****


No comments:

Post a Comment