Friday, September 23, 2016

डॉल्बीमुक्त, प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाबाबत प्रशासनाचे अभिनंदन बोगस डॉक्टरांवर कारवाईविषयी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत चर्चा


सातारा, दि.23 (जिमाका) :  जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी शोध मोहीम सुरु करावी. त्यासाठी आम्ही सर्वजण मदत करु, असे आश्वासन आज झालेल्या जिल्हा ग्राहक सरंक्षण परिषदेच्या बैठकीत सर्व सदस्यांनी दिले. तसेच डॉल्बीमुक्त, प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा झाल्याबद्दल आजच्या बैठकीत प्रशासनाच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक झाली. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य किरण साबळे-पाटील, संगिता चव्हाण, नितीन दोशी, विद्याधर कुलकर्णी, प्रल्हाद कदम, केदार नाईक, दिलीप पाटील, दत्तात्रय जाधव, अमर जाधव, उर्मिला येळगावकर, सुनीता सरडे, नगरसेविका दीपाली गोडसे, दिलीप भोसले, रितेश रावखंडे, विना पंडीत आदी उपस्थित होते.
या बैठकीत गॅस एजन्सी ग्राहकांची लुट करत असून गॅस सिलेंडर घरपोच करत नाहीत. असा मुद्दा श्रीमती पंडीत यांनी उपस्थित केला. त्यावर पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यात सर्व गॅस एजन्सी धारकांची स्वतंत्र बैठक बोलविण्यात येईल, असे सांगून श्रीमती बारवे यांनी ग्राहकांनीही आपल्या अधिकाराबाबत जागृक रहावे, असे आवाहन केले. वीज वितरण कपंनीकडे 123 शिड्या असाव्यात तसेच पुरेशे मनुष्यबळ असावे यावरही चर्चा झाली. त्याबाबतही तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल, असे अश्वासन श्रीमती बारवे यांनी दिले.
नुकताच झालेला गणेशोत्सव हा डॉल्बीमुक्त प्रदूषणमुक्त झाल्याबद्दल प्राध्यापक नागनाथ स्वामी यांनी प्रशासनाच्या अभिनंदनाचा ठराव माडला. नगरपालिकेच्या अधिकृत जागेत परवानगी घेवून फ्लेक्स उभे करावेत. त्यासाठी त्याबाबत वेगळा रंग असावा. त्या फलकावर परवानगीचे तारीख, फ्लेक्सची संख्या आणि मुदत प्रदर्शित करण्यात यावी, अशा सूचना पालिकेला देण्यात याव्यात. जिल्ह्यामध्ये डेंग्यूबाबत आरोग्य विभागाने जनजागृतीची तसेच प्रतिबंधात्मक मोहीम राबवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील रस्त्यांमधील खड्डे मुजवावेत. खंडाळा आरोग्य केंद्र परिसरात विजेच्या सुविधा कराव्यात. सेतू कार्यालयाने  कोणत्या दाखल्यासाठी किती शुल्क आकारणी याबाबत दर्शनी भागात फलक लावावेत. उपप्रादेशिक कार्यालयाने रिक्षांमध्ये ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी टोल फ्री क्रमांक लावणे बंधनकारक करावे. वर्तमानपत्रांनी ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या जाहिराती, सुंदर मुलीकडून शाही मशाज अशा प्रकारच्या आक्षेपार्य जाहिराती छापू नयेत. शेतकऱ्यांचा माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी पक्की पावती द्यावी, एसटी बससेस स्वच्छ असाव्यात आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. संबंधितांना याबाबत लेखी सूचना करण्यात येईल, असे आश्वासन श्रीमती बारवे यांनी दिले. जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांबाबत प्रशासनाने शोध मोहीम सुरु करुन कारवाई करावी.  त्यासाठी आम्ही सर्व सदस्य सहकार्य करु, असे आश्वासन सर्व सदस्यांनी दिले. सेमिनीज अशोका जातीचे टॉमेटो बियाणे सदोष असल्याबाबत 31 ग्राहकांनी तक्रार केली आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी श्रीमती पंडीत यांनी यावेळी केली. शेवटी दिलीप पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.
00000

No comments:

Post a Comment