Thursday, September 22, 2016

जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे 25 सप्टेंबरला आयोजन


                सातारा, दि.22 (जिमाका) : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता व महाराष्ट्र शासन यांच्या अर्थसहाय्याच्या समान निधी योजनेतून जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सातारा या कार्यालयामार्फत प्रतिष्ठानच्या समान व असमान निधी योजनांची माहिती जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना व्हावी, त्याचा लाभ घ्यावा व त्या माध्यमातून ग्रंथालयांचा सर्वांगिण विकास व्हावा या उद्देशाने जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन यशवंतराव चव्हाण इन्स्टीटयूट ऑफ सायन्स सातारा  या महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये रविवार दिनांक 25 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या प्रतिनिधीने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित रा.सोनवणे यांनी दिली.
                या जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांच्या हस्ते होणार असून पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. यामध्ये सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती असणा-या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. पुस्तिका कार्यशाळेला उपस्थित राहणा-या सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्व प्रतिनिधींना मोफत देण्यात येणार आहेत. तसेच वाचन संस्कृती व ग्रंथालय चळवळीबाबतची ऑडीओ व्हीजवल चित्रफित दाखविण्यात येणार आहे.
                ही कार्यशाळा तीन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये पहिले सत्र हे डिजिटल महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांची भूमिका: अपेक्षा आणि सेवा या विषयावर जयकर ग्रंथालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील सहाय्यक ग्रंथपाल, डॉ.बी.एम.पानगे मार्गदर्शन करणार आहेत. या विषयांतर्गत डिजिटल महाराष्ट्राची संकल्पना विशद सार्वजनिक ग्रंथालयांची भूमिका स्पष्ट करणार असून प्रामुख्याने ग्रंथालयांचे संगणकीकरण व आधुनिकीकरण करण्याची गरज, महत्व, आव्हाने, टप्पे, फायदे इ. घटकांविषयी माहिती सांगणार आहेत.
                दुस-या सत्रामध्ये राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या अर्थसहाय्याच्या विविध योजनांची माहिती या विषयावर कोलकाता राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानचे क्षेत्रीय अधिकारी (पश्चिम क्षेत्र) अनंत वाघ  आणि माजी ग्रंथालय निरीक्षक शाम दाईंगडे हे मागदर्शन करणार असून अर्थसहाय्याच्या समान व असमान निधीच्या योजनांविषयी सखोल माहिती देणार आहेत.
                तिस-या सत्रामध्ये महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967 व नियम, 1970 आणि सार्वजनिक ग्रंथालयांचे व्यवस्थापन  या विषयावर सांगोला महाविद्यालयाचे ग्रंथपाल नरेंद्र पाटील हे मार्गदर्शन करणार असून सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967 व महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये नियम, 1970 यांची ठळक वैशिष्टये व यामधील प्रमुख तरतुदींची माहिती देणार आहेत. तरी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे महत्व लक्षात घेवून सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी या कार्यशाळेस जिल्हयातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या किमान एका प्रतिनिधीने (अध्यक्ष, कार्यवाह, ग्रंथपाल)  यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन श्री. सोनवणे यांनी केले आहे.
0000


No comments:

Post a Comment