Friday, September 23, 2016

मानवी हक्काबद्दल व्यापक जागृती हवी - न्यायमुर्ती एस.आर बन्नुरमठ



सोलापूर दि. 23 – मानवी हक्कांची जोपासणा म्हणजे विश्वबंधुता वाढीस लावणे होय या हक्कांची जोपासणा करतानाच त्याबद्दल जागरुकताही आवश्यक आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मानवी हक्कआयोगाचे अध्यक्ष  तथा केरळ उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमुर्ती एस.आर. बन्नुरमठ यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मानवी हक्कआयोगाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात मानवी हक्क जनजागृतीबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आयोगाचे सदस्य सर्वश्री एम.ए. सईद, भगवंतराव मोरे,  विशेष महानिरिक्षक किशोर जाधव, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, मनपा आयुक्त विजय काळम – पाटील, पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभु, निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर आदी उपस्थित होते.
श्री. बन्नुरमठ पुढे म्हणाले की, सरकारी यंत्रणेकडून मानवी हक्काचे उल्लंघन होऊ नये त्याला पायबंद बसावा या अनुषंगाने हा आयोग कार्यरत असून तक्रारदारांनी सरसकट तक्रारी न करता ज्या तक्रारीत तथ्यांश आहे त्या तक्रारी आयोगाकडे जरुर पाठवाव्यात मात्र वैयक्तिक तक्रारी करु नयेत असे आवाहनही केले.
आयोगाचे सदस्य एम.ए. सईद म्हणाले की, सन 2013 पासून ज्या तक्रारी निकाली काढल्या आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने आयोगाने दिलेला  निर्णय शासनाने मान्य केला आहे त्याला  चॅलेंज केले नाही यावरुन आयोगाची विश्वासार्हता दिसून येते. तर श्री. मोरे म्हणाले की, मानवी हक्क आयोग स्वत:हून एखाद्या तक्रारीची दखल घेऊ शकतो. त्याला तो अधिकार आहे.
यावेळी   विशेष महानिरिक्षक किशोर जाधव, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेसाठी पोलीस, महसूल, विधी व इतर विभागाचे अधिकारी – कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                            000

No comments:

Post a Comment