Tuesday, September 20, 2016

वन विभाग आणि नगरपालिका दोघांनीही समन्वयाने कर वसुली करावी
                                      - पालकमंत्री विजय शिवतारे
                सातारा, दि. 20 (जिमाका)  : संयुक्त वन समिती आणि महाबळेश्वर नगरपालिका या दोघांनीही एकाच ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून कर वसुली करावी. नगरपालिका हद्दीतील पर्यटन ठिकाणी संयुक्त वन समितीने मिळणाऱ्या करामधून सोयीसुविधांसाठी काही भाग खर्च करावा, अशा सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज दिल्या.
                महाबळेश्वर येथे संयुक्त वन समिती आणि नगरपालिका या दोघांकडून करण्यात येणाऱ्या कर वसुलीबाबत आज येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार रमेश शेंडगे, महाबळेश्वरच्या नगराध्यक्ष उज्वला तोष्णीवाल, मुख्याधिकारी आशा राऊत, नगरसेवक डी.एम. बावळेकर आदी उपस्थित होते.
                यावेळी पालकमंत्री पुढे म्हणाले, महाबळेश्वर नगरपालिका ही वन विभागाच्या जागेत आहे. वन विभागाचे कायदे अत्यंत कडक आहेत. वन विभाग शासन निर्णयानुसार कर आकारणी करत आहे. पाच ठिकाणी प्रती व्यक्ती प्रत्येकी 10 असे एकूण 50 रुपये कर वसुली ऐवजी एकाच ठिकाणी 15 रुपये वन विभाग वसुली करणार आहे. यातून पर्यटकांना 35 रुपयांची सूट मिळणार आहे. यामुळे पर्यटकांचा फायदा होणार असून वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. नगरपालिकेने समन्वयाची भूमिका घ्यावी. कोणतीही अडचण येणार नाही.
                नगरपालिका हद्दीत जे पर्यटन स्थळे आहेत, त्या ठिकाणी संयुक्त वन समितीने मिळणाऱ्या करामधून पर्यटकांसाठी सुविधा द्याव्यात. त्याचबरोबर या ठिकाणी 10 दिवसात संयुक्त वन समिती गठीत करावी, असे आदेशही पालकमंत्री श्री. शिवतारे यांनी यावेळी दिले. एकाच ठिकाणी कर वसुली केल्याने त्यामध्ये पारदर्शकता राहील व यामधून नगरपालिकेचा फायदाच होईल त्यासाठी मी व जिल्हाधिकारी दुवा म्हणून सहकार्य करु. कोणी चुकीचे काम करत असेल तर मात्र प्रशासन कडक कारवाई करेल, असा इशाराही पालकमंत्री श्री. शिवतारे यांनी शेवटी दिला.

00000

No comments:

Post a Comment