Monday, September 26, 2016

कौशल्य विकास कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत


सातारा, दि.26 (जिमाका) : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षा जुलै, ऑगस्ट 2016 चा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला असून परीक्षेमध्ये तीन किंवा त्या पेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासन निर्देशानुसार व्यवसाय शिक्षण विभागाव्दारे कौशल्य विकास कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाची उपयुक्तता व तपशील शिक्षक तसेच लाभार्थी विद्यार्थ्यांपर्यंत  पोहोचविणे आवश्यक असल्याने याबाबतची माहिती संबंधीत शाळातील शिक्षक व लाभार्थी विद्यार्थ्यांना देण्यासाठी  त्यांचे उद्बबोधन व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था मुंबई यांच्या मार्फत करण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी दिली.
उद्बबोधनामध्ये सुसूत्रता आणून सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ व्हावा यासाठी उपरोक्त परीक्षेचे मूळ गुणपत्रक शाळांना दिनांक 24 सप्टेंबर 2016 रोजी विभागीय मंडळाच्या अधिनस्त असलेल्या नियोजित वाटप केंद्रावर वितरीत करण्यात येणार आहे. वितरण केंद्रावर दिनांक 24 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता कौशल्य विकास कार्यक्रमासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या सर्व माध्यमिक शाळातील लिपिक व सन 2015-16 चे इ.10 वी चे एक वर्ग शिक्षक अथवा विषय शिक्षक  यांनी उपस्थित राहावयाचे आहे. शिक्षकांना  या योजनेसंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार असून यामध्ये मोबाईल ॲप संबंधीत माहिती देण्यात येणार असल्याने उपस्थित राहणाऱ्या शिक्षकाकडे स्मार्ट फोन, इन्टरनेट सुविधेसह असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरच या शाळांना मुळ गुणपत्रिकांचे वितरण करण्यात येईल.
दि.26 सप्टेंबर 2016 रोजी शाळा मार्फत विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण करण्यात येईल. तत्पूर्वी कौशल्य विकास कार्यक्रमासाठी पात्र विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षित शिक्षक मार्गदर्शन करुन प्रत्येक विद्यार्थ्याचा कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा प्रवेश निश्चित करणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांस कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार आहे याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

कोल्हापूर विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व मान्यता प्राप्त माध्यमिक शाळाप्रमुखांना कळविण्यात येते की, जुलै, ऑगस्ट 2016 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या मुळ गुणपत्रिका वितरण व गुणपत्रिका तपासणी बाबतचे सविस्तर परिपत्रक कोल्हापूर विभागीय मंडळाच्या sscboardkolhapur.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. त्याचे अवलोकन व्हावे व त्यानुसार कार्यवाही करावी, असेही विभागीय सचिव यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment