Wednesday, September 28, 2016

कृषी पूरक उद्योगांनाही मुद्रा योजनेतून कर्ज द्या जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्या सूचना


              सोलापूर दि. 28 :-  मुद्रा बँक योजनेतून कृषी पूरक उद्योगानाही कर्ज पुरवठा केला जावा अशी सूचना जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेच्या प्रतिनिधींना केली.
               जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्ह्यातील बँकांचे प्रतिनिधी, मुद्रा बँक जिल्हा समन्वय समितीची बैठक झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात ही बैठक झाली. त्यावेळी त्यांनी वरील सूचना केल्या. बैठकीस जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीनिवास पत्की, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप झिले आणि राष्ट्रीयकृत बँकाचे जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.
               जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी सांगितले की, मुद्रा बँक कर्ज योजनेतून शेतीशी निगडीत व्यवसाय, उद्योगांना कर्ज देण्याबाबत कांही बँक अधिकाऱ्यांना शंका आहेत मात्र या योजनेतून कृषी पूरक उद्योगाला कर्ज देण्यात यावे. त्याबाबत राज्य शासनाकडून स्पष्टता करण्यात आली आहे.
               खरीप हंगामासाठी पीक कज वाटप करण्यात जिल्ह्यात असमाधानकारक काम झाले आहे. यंदा पाऊस चांगला पडला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातही पीक कर्जाचे वाटप करण्यात यावे. रब्बी हंगामात शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी सकारात्मक धोरण ठेवावे, अशा सूचना त्यांनी केल्या आर्थिक समावेशकता वाढवण्यासाठी बँकांनी गाव आणि तालुकास्तरावर मेळावे घ्यावेत. जेणेकरुन जास्तीत जास्त लोक बँकिंगच्या परिघात येतील, असेही त्यांनी सांगितले.
               यावेळी बँक ऑफ इंडियाचे अमोल सांगळे आणि अशोक कणगी यांनी बँकेमार्फत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
               मुद्रा बँक योजनेची व्यापक स्तरावर प्रसिध्दी करावी. त्यासाठी विविध माध्यमांचा वापर करावा अशा सूचना जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केल्या.
00000
                           



No comments:

Post a Comment