Thursday, September 29, 2016

विक्रीकर दिन सोहळ्याचे एक ऑक्टोबरला आयोजन



पुणे, दि. 29 (विमाका) :  विक्रीकर दिन सोहळा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत एक ऑक्टोबर २०१६ रोजी सकाळी ११ वाजता यशदा, बाणेर रोड, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे क्षेत्राचे अपर विक्रीकर आयुक्त ओ.चै. भांगडीया यांनी दिली आहे.
विक्रीकर विभाग हा राज्य शासनाच्या एकूण कर महसुलापैकी ६० टक्के कर गोळा करणारा विभाग असून दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील १ ऑक्टोबर २०१६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विक्रीकर दिन साजरा करण्यात येत आहे. पुणे विभागामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमास खासदार अनिल शिरोळे, महापौर प्रशांत जगताप, आमदार नीलम गोऱ्हे, आमदार सर्वश्री अनिल भोसले, विजय काळे, जगदीश मुळीक यांच्यासह  पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे.
            या कार्यक्रमामध्ये पुणे जिल्ह्यातील मोठे करदाते असलेल्या आठ व्यापाऱ्यांचा तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या विक्रीकर निरीक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. मुंबई येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यशदामध्ये या कार्यक्रमादरम्यान होणार आहे.
            विक्रीकर विभागातर्फे व्यापार करणे सुलभ व्हावे म्हणून करदात्यांना ई-नोंदणी, ई-विवरण, ई-लेखा परीक्षण अहवाल आदी ई-सुविधा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याबाबतीत हा विभाग देशात अग्रेसर आहे. दृष्टीक्षेपात लवकरच येऊ घातलेला वस्तु व सेवा कर म्हणजेच जीएसटी च्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने संगणकीकरण, अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आदी तयारी विभागात सुरु आहे. त्यादृष्टीने हा कार्यक्रम महत्वाचा आहे, असेही श्री. भांगडीया यांनी कळविले आहे.
****


No comments:

Post a Comment