Wednesday, September 21, 2016

जल व अन्न सुरक्षेबाबत आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते आज होणार उदघाटन

   

            पुणे,दि.21 : सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन ॲन्ड पॉवर, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा विभाग, केंद्रीय जल आयोग, इंडियन कॉन्सिल ऑफ ॲग्रीकल्चर रिसर्च यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 22 व 23 सप्टेबर,2016 दरम्यान पुणे येथे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रामध्ये जगभरातून मान्यवर तसेच 200 तज्ञ व्यक्ती सहभागी होणार आहेत. भविष्य काळामधील जल व अन्न सुरक्षेबाबत या चर्चासत्रात सादरीकरण करण्यात येणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते चर्चासत्राचे उद्घाटन होणार असून पालकमंत्री गिरीश बापट समारंभाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
            या चर्चासत्रामध्ये जलसंपदा विभागाच्या मर्यादेत पाणी साठ्यावर जास्तीत जास्त शेतमालाचे उत्पादन करण्याबाबत तसेच कमीत कमी पाणी उपलब्धतेवेळी त्याचा किफायतशीर वापर याबाबत चर्चा होणार आहे. मर्यादेत क्षेत्रामध्ये वाढत्या लोकसंख्येसाठी आवश्यक अन्नधान्य तसेच जनावरांसाठी चारा, पिण्याचे पाणी याबाबतच्या मर्यादा लक्षात घेता शेतकरी व पाणी वापरकर्ते यांच्यासाठी उपयुक्त, सहजासहजी वापरता येणारे तंत्रज्ञान विकसीत करणे, यासाठी जागरुकता निर्माण करणे हाच या चर्चासत्राचा प्रमुख उद्देश आहे.
            दोन दिवसीय चर्चासत्रामध्ये प्रामुख्याने जलसंवर्धन व समन्वयी पाणी वाटप, नदी खोरेनिहाय जल व्यवस्थापन, तंत्रज्ञानातील विकासाचा वापर करुन कार्यक्षम सिंचन व्यवस्थापन करणे, जल दर व त्याचा परिणाम, सिंचन व्यवस्थापनामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग, जलक्षेत्रातील कामामध्ये खाजगी क्षेत्राचा सहभाग या महत्वाच्या मुद्यांवर सविस्तर चर्चा होणार असून चर्चासत्रामध्ये सहभागी होणाऱ्यांना आवश्यक फी भरुन नोंदणी करता येईल. नाव नोंदणीसाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे, दूरध्वनी क्रमांक 020-26127466 येथे संपर्क साधावा, असे पाटंबधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रविण कोल्हे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांनी चर्चासत्रात या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ञांनी व संस्थांनी मोठया प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
000

No comments:

Post a Comment