Monday, September 19, 2016

लोहगाव विमानतळ वाहतुकीबाबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक


महानगरपालिका, एअरपोर्ट अथॉरीटी व एअर फोर्सने
समन्वयाने काम करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना
पुणे दि.19: पुणे महानगरपालिका, एअरपोर्ट अथॉरीटी व एअर फोर्सने समन्वयाने काम करत लोहगाव विमानतळाच्या कामांना तातडीने सुरुवात करण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज ‍दिल्या.
            लोहगाव विमानतळ वाहतुकीबाबत पालकमंत्री श्री. बापट यांच्या अध्यक्षतेखाली येथील व्ही.व्ही.आय.पी. सर्कीट हाऊस येथे आज बैठक  झाली. या बैठकीस पुणे महानगर पालिका आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरभ राव, आमदार जगदीश मुळीक, इंडीयन एअर फोर्सचे वेस्टर्न रिजनचे एअर ऑफिसर कमांडींग इन चिफ श्री. भारती, ग्रुप कॅप्टन यू. मनोज, एअरपोर्ट अथॉरिटीचे पुणे डायरेक्टर अजय कुमार, व्ही. के. सुरी, पी.एम. जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, महानगर पालिकेचे अधिक्षक अभियंता राजेंद्र राऊत, शहर अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित होते.
            या बैठकीत पुरू सोसायटी ते एअरपोर्ट रोड येथील ९०० मीटर रस्ता ए-बी, ५०१ चौक ते स.नं. २३८ पर्यंतचा ४०० मीटर रस्ता, सं.नं. २१४ येथील अस्तित्वातील कॉक्रीट रस्ता ते एअरपोर्ट हद्दीपर्यंत प्रस्तावित २८० मीटर रस्ता इ-एफ, ५०१ चौक ते एअरपोर्ट गेट पर्यंतच्या जुन्या रस्त्याचे विस्तारिकरण या विषयावर चर्चा करण्यात आली. या रस्त्यांच्या कामांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी पालकमंत्री श्री. बापट यांना दिली.
            यावेळी श्री. बापट म्हणाले, लोहगाव विमानतळावरुन दररोज हजारो प्रवासी  प्रवास करत असतात. विमानतळाला जोडणारे रस्ते अरुंद असल्याने या ठिकाणी वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे या विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्यांचे तातडीने काम सुरु करावे . तसेच विमानतळालगतच्या १६ एकर जागेवर डेव्हलपमेंट करण्यात येणार आहे. या ठिकाणची कामे महानगर पालिका, एअरपोर्ट अथॉरटी, एअर फोर्स यांनी समन्वयाने सुरु करावीत.  या तिन्ही विभागांनी आपला ॲक्शन प्लॅन तयार करुन कमीत कमी वेळेत काम पुर्ण करावे. या कामात कोणतेही अडथळे येत असतील तर तातडीने ते सोडविण्यावर भर द्यावा. तसेच संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, रस्ते वाहतूक महामार्ग आणि जहाजबांधणी, मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत झालेल्या बैठकीतील चर्चे नुसार तातडीने कामे सुरु करण्याच्या सूचना श्री. बापट यांनी  यावेळी दिल्या.
********

No comments:

Post a Comment