Thursday, September 22, 2016

जल व अन्न सुरक्षेबाबत आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उदघाटन



आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन
सिंचनाचे प्रभावी व्यवस्थापन करावे
                                         ... जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे
            पुणे, दि. 22 – जलव्यवस्थापनातील समस्यांचा अभ्यास करुन त्या शास्त्रोक्त पध्दतीने सोडवाव्यात आणि त्याद्वारे जल व अन्न सुरक्षा निश्चितीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन सिंचनाचे प्रभावी व्यवस्थापन करावे असे आवाहन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.
            सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवर, केंद्रीय जल आयोग, इंडियन कॉन्सिल ऑफ ॲग्रीकल्चर रिसर्च, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जल व अन्न सुरक्षेबाबत दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे हॉटेल कॉनरॅड येथे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उदघाटन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष जी.एस.झा, सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवर चे सचिव व्ही.के.कांजलीया, संचालक अे.सी.गुप्ता, महाराष्ट्र कृष्णा खेारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आर.बी.घोटे, सेवानिवृत्त सचिव सी.डी.थत्ते उपस्थित होते.
            यावेळी बोलताना जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये पाण्याचे नियोजन व त्याच्या व्यवस्थापनामध्ये मोठया प्रमाणावर कार्य झाले आहे. त्यामुळे फळे, भाजीपाला, कापूस व ऊस उत्पादनामध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. सिंचनासाठी कालव्यांऐवजी पाईपलाईनद्वारे पाण्याचे वितरण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यामुळे पाण्याचा योग्य वापर होऊन अपव्यय टाळता येईल.  मोर क्रॉप पर ड्रॉप धोरणानुसार पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करण्यात येत आहे. 
            भौगोलिक परिस्थितीमुळे राज्याचा सुमारे 60 टक्के भाग सिंचनापासून वंचित आहे. या भागाची सिंचनाची समस्या कायमची दूर व्हावी यासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेद्वारे गांवतपातळीवर जलसंवर्धनाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन ही काळाची गरज असून ही बाब मानवी जीवनाशी निगडित असल्यामुळे परिणामकारक व कार्यक्षमतेने पाण्याचे नियोजन करणे हे मोठे आव्हान आहे. जलव्यवस्थापनामधील समस्यांचा अभ्यास करुन त्या शास्त्रोक्त पध्दतीने सोडविण्यासाठी आणि त्यातून जल व अन्न सुरक्षा निश्चित होण्यासाठी या चर्चासत्राचा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
            देशामध्ये पाण्याचे स्त्रोत विकसीत करण्याचे कार्य केंद्रीय जल आयोगातर्फे करण्यात येते. पाणी नियोजनात नवनवीन तंत्रज्ञान व कार्यपध्दती स्विकारताना केंद्रीय जल आयोगाने महाराष्ट्र शासनाला विश्वासात घ्यावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
            या चर्चासत्रामध्ये जगभरातून तसेच भारतातील विविध राज्यांमधील जलव्यवस्थापनातील तज्ञ व मान्यवर सहभागी झाले आहेत.  जलसंपदा विभागाच्या मर्यादित पाणी साठयावर जास्तीतजास्त शेतमालाचे उत्पादन करण्याबाबत तसेच कमीत कमी पाणी उपलब्धतेवेळी त्याचा किफायतशीर वापरावर तज्ञांकडून चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी आवश्यक अन्नधान्य तसेच जनावरांसाठी चारा, पिण्याचे पाणी याबाबतच्या मर्यादा लक्षात घेऊन शेतकरी व पाणी वापरकर्ते यांच्यासाठी उपयुक्त, सहजासहजी वापरता येणारे तंत्रज्ञान विकसीत करणे, त्यासाठी जागरुकता निर्माण करणे हा या चर्चासत्राचा उद्देश आहे.
            गोदावरी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सी.ए.बीराजदार, विदर्भ विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता आय.एस.चौधरी, अधीक्षक अभियंता अतुल कपोले, केंद्रीय जल आयोगाचे माजी अध्यक्ष अे.बी.पांडे, ए.डी.मोहिले, विविध देशांमधून आलेले जलव्यवस्थापनातील तज्ञ, मान्यवर या चर्चासत्रात सहभागी झाले आहेत.
000

No comments:

Post a Comment