Wednesday, September 28, 2016

सीआयआरटी (CIRT) येथे वाहनचालकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन एसटी महामंडळाच्या वाहनचालकांनी प्रवाशांना उच्च दर्जाची सेवा द्यावी ... परिवहन मंत्री दिवाकर रावते



           पुणे,दि. 25 :- एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी चालकांवर असते. प्रवाशांना विनाअपघात व चांगल्या दर्जाची सेवा देता यावी यासाठी सीआयआरटी (CIRT) या आंतरराष्ट्रीय  दर्जाच्या केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेमध्ये चालकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या अत्यानुधिक व शास्त्रोक्त प्रशिक्षणाचा लाभ घेऊन चालकांनी प्रवाशांना उच्च दर्जाची सेवा द्यावी असे आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे केले.
           महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने भोसरी येथील केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेमध्ये (CIRT) वाहनचालकांसाठी सपत्निक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन करताना परिवहन मंत्री दिवाकर रावते बोलत होते. व्यासपीठावर महामंडळाचे महाव्यवस्थापक सुर्यकांत अंबाडेकर, केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेचे संचालक आशिष मिश्रा, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील उपस्थित होते.
           यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले की, वाहनचालकांसाठी सपत्निक प्रशिक्षणाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या धावपळीच्या परिस्थितीमध्ये वाहनचालकांना एसटी चालवावी लागते. वाहनचालकांवर प्रवाशांची जबाबदारी असते. खाजगी प्रवासी वाहनांमुळे स्पर्धा वाढली आहे. यामुळे वाहनचालकांवर मानसीक दबाव निर्माण होतो. वाहन चालकांच्या सेवेचा दर्जा वाढविणे आणि त्यांच्या अडचणी सोडविणे आणि यामध्ये त्यांच्या कुटूबियांचा सहभाग असावा या उद्देशाने सपत्निक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले की, एसटीतील कर्मचाऱ्यांचे जीवन सुसहय व्हावे यासाठी अधिकाऱ्यांनी कुटूंब प्रमुखाच्या नात्याने कर्मचाऱ्यांशी संबंध ठेवावे. तणावमुक्त वातावरणात वाहनचालकांचा सर्वांगिण विकास होण्याच्यादृष्टीने प्रशासकीय व्यवस्था निर्माण करावी अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
           केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेचे संचालक आशिष मिश्रा यांनी, सीआयआरटीमध्ये देण्यात  येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षणाचा उपयोग चालकांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजात करावा असे सांगितले.
           महामंडळाचे महाव्यवस्थापक सुर्यकांत अंबाडेकर यांनी प्रशिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून प्रवाशांना चांगल्या दर्जाची सेवा देण्यासाठी वाहनचालकांना प्रशिक्षण आवश्यक असल्याचे सांगितले. प्रवासी वाहतूकीमधील नवनवीन बदलाची माहिती व्हावी आणि वाहनचालकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी टप्याटप्याने सर्व वाहनचालकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले. 
           या प्रशिक्षणात सुमारे पन्नास वाहन चालक सपत्निक सहभागी झाले असून प्रशिक्षण तीन दिवस चालणार आहे. या कार्यक्‌रमास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment