Thursday, October 13, 2016

आदिवासींसाठी 19 ऑक्टोबरला मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण



पुणे, दि. १३  (विमाका) : आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी बांधवांसाठी 'गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनाच्या एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन दि. १९ ऑक्टोबर २०१६ रोजी येथील सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय आणि भुवनेश्वर येथील केंद्रीय गोडेपाणी मत्स्यसंवर्धन संस्थान (सीआयएफए) यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव (ता. जुन्नर) येथे करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय विजय शिखरे यांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर व आंबेगाव तालुक्यांमध्ये आदिवासी बांधवांची संख्या मोठी आहे. परंपरागत व्यवसायांद्वारे ते आपली उपजीविका भागवत असतात. त्यांना पारंपरिक शेतीबरोबर शेततळी, उपलब्ध छोटे जलस्त्रोत यामध्ये मत्स्यशेतीद्वारे अतिरिक्त रोजगाराचे  साधन उपलब्ध होण्यास प्रचंड वाव आहे. याची व्यापक जनजागृती होण्यासाठी आदिवासी उपयोजने अंतर्गत दि. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत 'गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन आदिवासी लोकांसाठी उपजीविकेचे साधन' या विषयावर एक दिवसीय विनामुल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या प्रशिक्षणामध्ये मत्स्यसंवर्धनासाठी योग्य माशांच्या जातीची ओळख, कार्प माशांचे संवर्धन, तिलापिया माशाचे संवर्धन, मत्स्यव्यवसाय आधुनिक तंत्रज्ञान आदी विषयांवर सीआयएफए भुवनेश्वरचे शास्त्रज्ञ व पुणे मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवार आदिवासी समाजाचा असावा. त्याच्याकडे मत्स्यशेतीसाठी शेततळे किंवा इतर जलस्त्रोत उपलब्ध असावेत. प्रशिक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी दीपक कुऱ्हाडे (मो.नं. ९९२१७४५९२४), जनक भोसले (मो.नं. ९४२२३१४८१४), सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय विजय शिखरे (मो.नं. ८८२२३८५०१८) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन एका प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.
****

No comments:

Post a Comment