Thursday, October 13, 2016

१५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन



पुणे, दि. १३ (विमाका): विद्यार्थी व समाजाच्या इतर घटकांमध्ये वाचनाची आवड व प्रेरणा निर्माण व्हावी या उद्देशाने माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. हा दिवस कशा पद्धतीने साजरा करावयाचा याबाबत शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अनेक सूचना दिल्या असून राज्यभरात त्यानुसार विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी कळविले आहे.
 डॉ. माने यांनी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक यांना नुकतेच पत्राने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार विद्यापीठे, शासकीय व अशासकीय महाविद्यालये शैक्षणिक संस्था यामध्ये  पुस्तकांच्या वाचनाच्या अनुषंगाने व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा आदी कार्यक्रम आयोजित करावेत. शाळा, महाविद्यालय, ग्रंथालय व अन्य संस्थांनी आपल्या परिसरात 'डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन कट्टा' निर्माण करावा. सार्वजनिक कार्यक्रमात पाहुण्यांना पुष्पगुच्छांऐवजी पुस्तक भेट देण्याच्या शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्यात यावी.
            सर्व विद्यापीठांनी आपल्या अधिकार क्षेत्रातील महाविद्यालयांना वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याबाबत सूचना द्याव्यात. विद्यापीठ, महाविद्यालये व अन्य संस्थांनी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यासाठी ठरविलेल्या कार्यक्रमाची माहिती व कार्यक्रम झाल्यांनतर कार्यक्रमांचा छायाचित्रांसह अहवाल संचालनालयास व मंत्री श्री. तावडे यांच्या ईमेलवर सादर करावा, अशाही सूचना डॉ. धनराज माने यांनी दिल्या आहेत.
****

No comments:

Post a Comment