Monday, October 24, 2016

मत्स्य शेतीव्दारे आदिवासींचे जीवनमान उंचवण्यास मदत - मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त विजय शिखरे



पुणे. दि. 24 (विमाका): - आदिवासी बांधवांनी मत्स्यशेतीव्दारे पूरक व्यवसाय केल्यास उपजिविकेचे अतिरिक्त साधन निर्माण होऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवण्यास निश्चितच मदत होईल. मत्स्यव्यवसाय विभागातर्फे आदिवासी बांधवांना आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असे  प्रतिपादन मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त विजय शिखरे यांनी केले.
सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, पुणे  केंद्रीय गोडेपाणी मत्स्यसंवर्धन संस्थान (सिफा) भुवनेश्वर, ओरिसा यांच्या संयुक्त विदयमाने पुणे जिल्हयातील आदिवासी बांधवांसाठी नारायणगाव ता. जुन्नर येथील कृषि विज्ञान केंद्रामध्ये 'गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन : आदिवासी  लोकांसाठी  उपजिविकेचे साधन' या विषयी एक दिवसीय जनजागृती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.  कार्यक्रमास सीफाचे प्रधान शास्त्रज्ञ जनुक विभागाचे प्रमुख डॉ.जे.के.सुंदराय, प्रधान शास्त्रज्ञ डॉ.बी.सी.महापात्रा, शास्त्रज्ञ पंकज पाटील, किरण रसाळ, केंद्रीय मत्स्यिकी  शिक्षा संस्थान, वर्सोवा मुंबईचे डॉ.किरण दुबे-रावत, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी जनक भोसले, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.बी.सी.रजपूत आदी उपस्थित होते.
प्रारंभी डॉ.जे.के.सुंदराय यांनी सहभागी झालेल्या शेतक-यांना परिसरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक पाण्याचा वापर मत्स्यपालनासाठी कसा करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ.बी.सी.महापात्रा यांनी कार्प माशांचे प्रजनन करण्यासाठी कमी खर्चात कोठेही उभारता येणारी पोर्टेबल हॅचरी, त्याचे व्यवस्थापनाबाबत तसेच देशामध्ये विविध भागात राबविलेल्या मत्स्यपालन योजनांबद्दल माहिती दिली. पंकज पाटील यांनी  गोडया पाण्यातील  मत्स्यशेतीसाठी पोषक  माशांच्या  जातींची ओळख, कार्प माशांचे संवर्धन व्यवस्थापन याबाबत माहिती दिली.
पुणे जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त विजय शिखरे यांनी पुणे जिल्हयामध्ये  मत्स्यव्यवसाय विभागामार्फ घेण्यात  येणाऱ्या  विविध कार्यक्रमांची माहिती दिली. तिलापिया माशाचे संवर्धन तसेच शेततळयातील मत्स्यशेती बाबत मार्गदर्शन  केले.
किरण रसाळ म्हणाले की, सिफा संस्था ही आशिया खंडातील एकमेव कार्प मासळीचे तसेच गोड्या पाण्यातील माशांच्या संवर्धनाबाबत संशोधन करणे आणि शेतकरी बांधवांसाठी प्रशिक्षण प्रचार करण्याचे काम करीत असून भुवनेश्वर येथे 147 हेक्टर क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. डॉ. किरण दुबे-रावत यांनी केंद्रीय मत्स्यिकी  शिक्षा संस्थानतर्फे डिंभे जलाशय परिसरामध्ये आदिवासी बांधवांसाठी  राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहीती दिली. आदिवासी कार्यकर्ते मारूती काळे यांनी शेतकऱ्यांना मत्स्यपालन करण्यासाठी प्रोत्साहीत केले.
             जनक भोसले यांनी  मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे औचित्य साधून 'शाश्वत मत्स्यसंवर्धनासाठी दर्जेदार मत्स्यबिजाचे महत्व', 'पोर्टेबल एफआरपी कार्प मासळी हॅचरी' 'कार्प मासळीचे संवर्धन' या तीन माहितीपत्रकांचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. मत्स्यव्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्रीय गोडेपाणी मत्स्यसंवर्धन संस्थान, भुवनेश्वर, मत्स्यव्यवसाय विभाग कृषी विज्ञान केंद्र यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आश्वासन दिले.

हे प्रशिक्षण आदिवासी उपयोजनेअंतर्गत घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. बी. सी. रजपूत होते. प्रशिक्षणामध्ये 190 लोकांनी सहभाग नोंदविला.

No comments:

Post a Comment