Friday, October 14, 2016

मानसिक आरोग्याची माहिती घेवुया..! मानसिक आजाराला हरवुया…!!


       10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन. यानिमित्त ससून सर्वोपचार रुग्णालय आणि महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेच्या वतीने दिनांक 10 ते 16 ऑक्टोबर 2016 या कालावधीत 'मानसिक आरोग्य सप्ताह' पाळण्यात येत आहे. या सप्ताहात जनजागृतीसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मानसिक आरोग्य सप्ताह निमित्त हा लेख......
जागतिक आरोग्य संस्था (WHO) ने स्वास्थाची संकल्पना मांडताना स्वास्थ्याबरोबरच शारीरिक आणि मानसिक स्वास्थालाही महत्व दिले आहे. मानसिक आरोग्य म्हणजे भावनिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या निरोगी असणे. मानसिक आरोग्य आपण कसा तणाव सांभाळतो, इतरांशी कसे वागतो, विचार करून विविध गोष्टींची कशी निवड करतो यावरुन ठरते.
मानसिक आरोग्य जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडते. अगदी बालपणापासून ते ज्येष्ठांपर्यंत जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर मानसिक आजार होऊ शकतो, ज्यामध्ये विचार करण्याची क्षमता आणि वागणुकीतही बदल होतो. मानसिक आजार खालील गोष्टींमुळे होऊ शकतो-
·        जीवशास्त्रीय घटक जसे जनुकीय बदल, जैवरासायनिक बदल.
·        कुटुंबामध्ये मानसिक आजार असणे.
·        जीवनात वाईट अनुभव जसे लैंगिक शोषण, जवळच्या व्यक्तींचे निधन.
मानसिक आजार असण्याची सुरवातीची लक्षणे ओळखून मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला लवकरात लवकर घेतल्यास मानसिक आजार आटोक्यात येऊ शकतो. अतिजास्त अथवा कमी झोप येणे, लवकर थकणे, काम करण्याची इच्छा नसणे, भावनिक क्रिया मंदावणे, असहाय्य व हताश वाटणे, अति प्रमाणात व्यसन करणे, अति जास्त चिंता करणे, चिडचिडपणा करणे, कानात आवाज ऐकू येणे- जे दुसरे लोक ऐकू शकत नाहीत, स्वतःला ईजा करण्याचे विचार मनात येणे, स्वतःची दैनंदिन कामे करू न शकणे, ही मानसिक आजाराची लक्षणे होत.
आपले मानसिक आरोग्य सांभाळायचे असल्यास नेहमी सकारात्मक राहावे, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहा. दुसऱ्यांची मदत करा. चिंतेचा सामना करा. वेळेवर नीट झोप घ्या.
आपल्या समाजात मानसिक आजाराबाबत काही भ्रम आहेत.
·        भ्रम:  मला मानसिक आजार होणे शक्य नाही.
सत्य:  मानसिक आजार कुणालाही होऊ शकतो.
·        भ्रम: मानसिक रुग्ण हे रागीट आणि आक्रमक असतात.
सत्य: फक्त ३ ते ५ टक्के मानसिक रुग्ण हे आक्रमक असतात. उलट मानसिक रुग्ण हेच लोकांच्या हिंसेला बळी पडतात.
·        भ्रम: मानसिक आजार हे कधीच बरे होत नाहीत.
सत्य: मानसिक आजार हे औषधावर नियंत्रित राहतात तर काही आजार हे बरे होतात.
·        भ्रम: मानसिक रुग्ण हे काम करू शकत नाहीत.
सत्य: किती तरी मानसिक रुग्ण हे व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे आहेत.
तर मग चला मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मानसिक आरोग्य व मानसिक आजार यांची योग्य माहिती घेऊया आणि सर्वांनी मिळून मानसिक आजाराला हरवुया.
शब्दांकन :- डॉ. स्वप्नील अलोणे,
    लेखन :-  डॉ. मनजित संत्रे
बै.जी. महाविद्यालय, पुणे


No comments:

Post a Comment